
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी बॉलीवूडची प्रतिमा मलीन करणाऱयांचा आज समाचार घेतला. ज्या ताटात खातात, त्याच ताटात छेद करतात, असे म्हणत त्यांनी भाजप खासदार रवी्यकिशन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. तसेच फिल्म इंडस्ट्रीला सरकारच्या सुरक्षेची आणि पाठिंब्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
राज्यसभेत मंगळवारी शून्यप्रहराच्या तासाला बोलताना जया बच्चन यांनी बॉलीवूडवर होणाऱया टीकेचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच इंडस्ट्रीला गटार म्हणत आहेत. चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसभेचे एक सदस्य काल इंडस्ट्रीविरोधात बोलत होते. हे निंदनीय आहे. माझा याला पूर्ण विरोध आहे. मी आशा करते की लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये, असं सरकारकडून त्यांना सांगण्यात येईल. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठींबा द्यावा.
बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणाच्या मुद्दय़ावरून सोमवारी संसदेत चर्चा झाली होती. त्यावेळी भाजप खासदार रवी किशन यांनी या प्रकरणाचा खोल तपास केला गेला पाहिजे. ज्यामुळे सिनेजगतावर जो डाग पडला आहे, तो साफ होईल असे वक्तव्य केले होते. तसेच ड्रग्ज तस्करी आणि तरुणांना लागलेले व्यसन हे एक मोठं संकट आहे. तरुणांना भरकटवण्यासाठी चीन आणि पाकिस्तानचा हा कट आहे. पंजाब आणि नेपाळद्वारे ड्रग्ज संपूर्ण देशात पसरवण्याचा प्रकार घडत आहे. बॉलीवूडमध्ये ड्रग्ज घेणाऱयांचे प्रमाण जास्त आहे, असा आरोप त्यांनी केला.
जया बच्चन यांच्यासारखं बनायचंय
बॉलीवूडची प्रतिमा मलीन करणाऱयांना खासदार जया बच्चन यांनी खडे बोल सुनावल्यानंतर काही बॉलीवूड कलाकार जया बच्चन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. अनेकांनी ट्विट करून जया बच्चन यांचे कौतुक केले. अशातच अभिनेत्री सोनम कपूर हिचे ट्विट लक्षवेधी ठरले. सोनमने बच्चन यांचा राज्यसभेतील भाषणाचा व्हिडीयो शेअर करत लिहिलं, मी जेव्हा मोठी होईन, तेव्हा मला असं बनायचंय….सोनमने थेट जया बच्चन यांच्यासारखं बनायचंय असं सांगून भविष्यात राजकारणात प्रवेश करायला आवडेल, असे जणू संकेतच दिले. सोनमप्रमाणे तापसी पन्नू, अनुभव सिन्हा, फरहान अख्तर आदींनी खासदार बच्चन यांना पाठींबा दिला.
कंगनाचा जया बच्चन यांना सवाल
बच्चन यांची मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक यांचे नाव घेत कंगनाने ट्विट केले. ‘जयाजी माझ्या जागी तुमच्या मुलीला श्वेताला, ती किशोरवयीन असताना मारहाण झाली असती, ड्रग्ज दिले असते किंवा तिचा विनयभंग झाला असता, तर तेव्हाही तुम्ही हेच बोलला असता का, असा सवाल तिने केला आहे.






























































