
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा निकटवर्तीय असलेला पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातला बडा नेता लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. तो नेता म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असल्याचे वृत्तही काही वाहिन्यांनी दिले. मात्र जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत अत्यंत चपखल शब्दांत त्याला उत्तर दिले. होऊ द्या काय ती चर्चा… मी कुठेही येणार नाही, जाणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
अजित पवार 40 आमदारांचा गट घेऊन भाजपात गेल्यानंतरही जयंत पाटील हे शरद पवार यांच्याबरोबर ठामपणे उभे आहेत. त्यामुळे आपल्याबद्दल सुरू झालेल्या चर्चांना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. तुम्ही भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा दर पंधरा दिवसांनी का होते असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, पंधरा नव्हे दर आठ दिवसांनी माझ्याबद्दल चर्चा होतेय. ही चर्चा का होतेय, कोण घडवून आणतेय हे तुम्ही पत्रकारांनीच शोधून काढा, एवढे माझे काम करा, असेही ते मिश्कीलपणे म्हणाले. आपल्याबद्दल होत असलेल्या चर्चांसाठी जयंत पाटील यांनी या वेळी प्रसारमाध्यमांना जबाबदार धरले. पण आपला प्रसारमाध्यमांवर राग नसून त्यांच्या बातम्यांमुळे आमचा लोकांशी संपर्क होतो असे म्हणत त्याचे श्रेयही त्यांनी माध्यमांना दिले.
भाजपकडून कोणतीही ऑफर नाही
भाजपकडून आपल्याला कोणतीही ऑफर नसल्याचेही जयंत पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. कोणत्याही भाजपच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही किंवा मी त्यांच्याशी कोणताही संपर्क केला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्याबद्दल अशा चर्चा रंगतात याचेच मला आश्चर्य वाटते, असेही ते म्हणाले.
माझ्यासाठी मंत्रिपद हे प्रलोभन असू शकत नाही
महत्त्वाच्या खात्याचे मंत्री बनवण्याचे आमिष दाखवले जातेय अशीही तुमच्याबद्दल चर्चा आहे असेही या वेळी माध्यमांनी विचारले. त्यावर गेली 17-18 वर्षे मी मंत्रिमंडळात काम केले आहे, त्यामुळे माझ्यासाठी केवळ मंत्रिपद हे एकमेव प्रलोभन असू शकत नाही, असे मार्मिक उत्तर जयंत पाटील यांनी दिले.




























































