
लसीचा उत्सव करणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत. मात्र हा उत्सव करायला लस तरी उपलब्ध असायला हवी. लसच देशात कमी पडत असेल तर काही भागांनी लस देण्याचा कार्यक्रम थांबवायचा आणि काही भागांनी उत्सव करायचा हे चुकीचं आहे. पंतप्रधानांना देशाचे आरोग्यमंत्री व्यवस्थित माहिती देत नसावेत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज लगावला.
जयंत पाटील यांनी आज लस उत्सव संकल्पनेवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आपल्याकडे लस कमी आहे आणि लसीचा अपुरा पुरवठा होतोय. आमची हीच मागणी आहे की ज्या राज्यात कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव झालाय तिथे जास्त लस द्यायला हवी. 40 ते 50 लाखांची मागणी करूनही केवळ साडेसतरा लाख देण्याचं मान्य केलं आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिह्यातील आरोग्य केंद्रावर आम्ही लसी पाठवू त्यावेळी हे साडेसतरा लाख कधी संपतील हेही कळणार नाही. पाच ते सहा दिवसांत हा साठा संपेल, असे जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रासोबत दुजाभाव होतोय हे मोदींना कळलं तर त्यांना सहन होणार नाही
मोदी साहेबांना जे पाहिजे ते देश करायला तयार आहे. फक्त पुरवठा झाला पाहिजे आणि ते खरं असलं पाहिजे. त्यांचं शास्त्रीय कारण असेल दिवे लावण्यासंबंधी, सर्व देशाला थाळी वाजवायला सांगण्यासंबधी त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी थाळ्या वाजवल्या. त्याबद्दल काही आमची तक्रार नाही. लसीचा उत्सव करण्यासाठी आम्ही तयार आहोत, पण लस द्या. जर लसच नसेल तर हा उत्सव करण्याच्या वेळा बदला. देशाच्या पंतप्रधानांना देशाचे आरोग्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे सर्व नेते या महाराष्ट्राची गरज समजावून सांगायला कमी पडत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेबाबतीत दुजाभाव केला जातोय हे मोदी साहेबांना कळलं तर ते कधी सहन करतील असं मला वाटत नाही, अशी कोपरखळीही जयंत पाटील यांनी यावेळी काढली.


























































