भगवद्गीतेप्रमाणे आचरण – काळाची गरज

>> जयेश राणे

आपण कलियुगात जन्माला आलेले मनुष्य जीव आहोत. त्यामुळे दुःख, कष्ट, आनंद, समाधान यांत चढउतार अनुभवत असतो. कोणी पुष्कळ समाधानी दिसतो, तर कोणी दुःखी, कष्टी दिसतो. ज्यांच्या आयुष्यात कायम दुःख असते त्यांच्यापैकी काहींचे म्हणणे असे असते, ‘देवाचे करून काय उपयोग. आमच्या दुःखात जराही घट नाही. उलट नवीन संकटे आवासून समोर उभी राहत आहेत आणि नाकीनऊ आणत आहेत.’ या जन्मात जरी दुःख वाटय़ाला असले तरी खचून न जाता धैर्याने त्याचा सामना कसा करावा? याची उत्स्फूर्त प्रेरणा भगवद्गीता देते.

माणसाने माणूस म्हणून जीवन कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन असलेला ग्रंथ म्हणजे ‘भगवद्गीता’ होय. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेनुसार आचरण करणारे हाताच्या बोटावर मोजावे इतकेच लोक आहेत. जे याप्रमाणे मार्गक्रमण करत आहेत ते नक्कीच आनंदी, समाधानी आहेत, यात शंकाच नाही. कारण साक्षात भगवंताचे वचन पालन केले जात असल्याने त्यानुसार त्या व्यक्तीकडून अपेक्षित कृती करवून घेण्याचे दायित्व (जबाबदारी) भगवंताचे असते. ‘आपण एक पाऊल भगवंताच्या दिशेने टाकल्यावर तो आपल्यासाठी दहा पावले टाकत आपल्यापर्यंत येतो,’ या वाक्याचा अर्थ वरील सूत्रावरून लक्षात येतो.

आपण कलियुगात जन्माला आलेले मनुष्य जीव आहोत. त्यामुळे दुःख, कष्ट, आनंद, समाधान यांत चढउतार अनुभवत असतो. कोणी पुष्कळ समाधानी दिसतो, तर कोणी पुष्कळ दुःखी, कष्टी दिसतो. कठीण प्रसंगात देवाचे स्मरण सतत होत असते आणि एकदा का कठीण प्रसंगातून सुटका झाली की देवाचे स्मरण कमी-कमी होत जाते. ज्यांच्या आयुष्यात कायम दुःख असते त्यांच्यापैकी काहींचे म्हणणे असे असते, ‘देवाचे करून काय उपयोग. आमच्या दुःखात जराही घट नाही. उलट नवीन संकटे आवासून समोर उभी राहत आहेत आणि नाकीनऊ आणत आहेत.’ असे असले तरी भगवंतावरील निष्ठा तसूभरही ढळू न देता त्याचे चरणकमल घट्ट पकडून ठेवले तर संकटांतून मार्ग निघतोच निघतो. सकारात्मक न राहता देवालाच दुषणे देत राहिलो तर सहाय्य करण्यासाठी देवाची सिद्धता असूनही आपण ते मिळवण्यासाठी असमर्थ ठरतो. या जन्मात जरी दुःख वाटय़ाला असले तरी खचून न जाता धैर्याने त्याचा सामना कसा करावा? याची उत्स्फूर्त प्रेरणा भगवद्गीता देते.

‘प्रयत्नांती परमेश्वर’ असे म्हटले जाते. प्रामाणिक मेहनतीला परमेश्वराच्या कृपेचे अधिष्ठान असेल, तर अल्प कालावधीत ध्येय प्राप्ती होते. कारण साक्षात भगवंतच पाठीराखा असल्याने आपले काम तोच पूर्णत्वास नेतो आणि सर्व कर्ताकरविता तोच असूनही नामानिराळा राहतो. कुठलाच कर्तेपणा स्वतःकडे घेत नाही. तो सर्व श्रेय मनुष्यालाच देतो. भगवंताच्या या कृतीतून बोध घेण्याचा भाग म्हणजे मीपणापासून अलिप्त राहणे. आज माणसाला मीपणाच म्हणजेच घमेंड-अहंकार झाल्याने माणुसकी रसातळाला गेली आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे रस्त्यावर डोळय़ांदेखत अपघात झाल्यावर, त्या ठिकाणी अपघातग्रस्ताला सहाय्य म्हणून तत्काळ रुग्णालयात भरती करण्यासाठी पुढे जाण्याऐवजी, त्या सर्व घटनेचे ध्वनीचित्रण करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात धन्यता मानली जाते. रुग्णालयात त्या जखमीला भरती करणे सोडाच, अहो साधा पोलीस किंवा जवळील रुग्णालयाला फोन करण्याची बुद्धी लोकांना होत नाही. समोर अत्यावश्यक स्थितीत फोन करण्याची सूची (यादी) फलकावर असेल तरी फोन लावण्याची तसदी घेतली जात नाही आणि आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत. केवळ वैयक्तिक मौजमजा, स्वार्थ, स्वतःचे कुटुंब, नातेवाईक, जावई, नातवंडे यांत इतके गुरफटलो आहोत की, आपले जग आपण स्वतःच मर्यादित करून ठेवले आहे. त्यामुळे समाजऋण काय असते, याची कल्पना नाही. तसेच त्याविषयी जाणून घेण्यात रस नाही. पोथी वाचन, नामजप, भजन-कीर्तन, उपवास आदी श्रद्धेने करत असलो तरी आपल्यामुळे कोणी दुखावला जात नाही ना? आपण कोणाच्या किती आणि कसे उपयोगी पडतो? एखाद्याला सहाय्य हवे असताना आणि ते करणे सहज शक्य असताना कारणे देतो की, खरेच त्याला पूर्णपणे सहाय्य करतो. आदी सर्व सूत्रांकडे भगवंताचे बारीक लक्ष असते. दुसऱ्याला फसवू शकतो, खोटे बोलू शकतो, पण स्वतःच्या मनाशी आणि प्रत्येकात असणाऱ्या भगवंताशी कसे खोटे बोलणार आणि त्याला कसे फसवणार? खऱ्या-खोटय़ाचा चोख हिशोब भगवंताकडे असतो आणि त्याप्रमाणे तो आपल्याला द्यावाच लागतो. यातून कोणाचीच सुटका नाही. जे पोटात आहे तेच ओठात ठेवा. दुतोंडीपणा उपयोगी नाही. स्वतःच स्वतःच्या विनाशास कारण बनू नका.

बलात्कार, चोऱ्या, मारामारी, लुटालूट, गुंडगिरी, खून, दरोडे, अतिरेकी-माओवादी कारवाया, भ्रष्टाचार, स्वार्थ, हिंसकपणा, निराशा, आत्महत्या, वासनांधता, अश्लीलता, बेकारी, महागाई, संसर्गजन्य आजार, निसर्गचक्र बिघडल्याने अवकाळी पाऊस येऊन पिकांची हानी होणे, ओला-कोरडा दुष्काळ, महागडे शिक्षण, लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या पडत असलेल्या आरोग्य सुविधा, प्रांतवाद, पैशांसाठी स्वतःच्याच देशाची माहिती शत्रूला पुरवणे, शत्रूच्या हनी ट्रपमध्ये अलगद फसून त्यांच्या तालावर नाचणे, माणुसकी लोप पावणे, बंद, संप, वाढते घटस्फोट, कामावरील कौटुंबिक तणाव आदी एक ना अनंत अडचणी मनुष्यासमोर आहेत. या सर्वांवर एकच उपाय तो म्हणजे भगवद्गीतेनुसार आचरण. ही काळाची अत्यावश्यकता आहे.

विशेष कौतुकास्पद सूत्र म्हणजे कित्येक अल्पवयीन मुले-मुली गीतेचे श्लोक पठण करण्याच्या स्पर्धेत भाग घेतात आणि त्यात प्रथम क्रमांक पटकवतात. लहानपणापासूनच त्यांच्या कोवळय़ा मनावर गीतेचे संस्कार होत असल्याने, त्यांचे भावी जीवन उज्ज्वल असणार यात तिळमात्रही शंका नाही. मोठय़ांनीही लहानग्यांप्रमाणे कृती करत भगवद्गीतेचा अभ्यास आणि त्याप्रमाणे आचरण करण्यास आरंभ करावा. प्रामाणिक मेहनतीला यश देण्यासाठी सृष्टीचा कर्ताकरविता भगवान श्रीकृष्ण आहेच.