एकत्रित निवडणुका मोदींना हुकूमशाहीचे दार खुले करतील!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्याचा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘हुकूमशाही’चे दार खुले करेल, असा इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेते खासदार जयराम रमेश यांनी येथे दिला. ते एका चर्चासत्रात बोलत होते.

‘जीएसटी’ लागू करताना मोदी यांनी ‘एक राष्ट्र, एक कर’ हा नारा दिला होता. त्यापाठोपाठ ते आता ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या मंत्राचा जप करू लागलेत. असे सांगतानाच ऍडॉल्फ हिटलरने १९३० सालात अशाच प्रकारचा ‘एक संस्कृती, एक नेता’ नारा दिला होता, याची आठवण रमेश यांनी करून दिली.

गांधीजी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या उत्तुंग नेत्यांनी एकतेचा हिरीरीने पुरस्कार केला. तर ‘संघ’ हा एकसारखेपणावर भर देतो, असे सांगून ते म्हणाले की, ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या नाऱ्यामागे एकसारखेपणाचाच ध्यास आहे. पण त्याने एकतेला बाधा पोहोचणार असल्याने आम्ही एकतेसाठीच झगडणार आहोत. एकत्रित निवडणुकांचा प्रकार हा लोकशाही आणि उत्तरदायित्वाशी विसंगत असून संघराज्य रचना उद्ध्वस्त करणारा आहे, असे मत रमेश यांनी व्यक्त केले.

निवणुकांवरील वाढता खर्च हा चिंतेचा विषय जरूर आहे; पण निवडणूक पद्धतीत सुधारणा करून त्यावर मात करता येईल. एकत्रित निवडणुका हा काही त्यावरचा उपाय ठरू शकत नाही.
-जयराम रमेश, ज्येष्ठ काँग्रेस नेते