भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवून चंपाषष्ठी साजरी, जेजुरी खंडोबाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा गजर अन् भंडारा—खोबऱयाची उधळण करत बुधवारी खंडोबाच्या चंपाषष्ठाr यात्रेला हजारो भाविकांनी जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतले. पारंपरिक प्रथेप्रमाणे देवाला पुरणपोळीबरोबरच वांग्याचे भरीत-रोडगा (बाजरीची भाकरी), कांद्याच्या पातीची भाजी असा नैवेद्य दाखविण्यात आला.

बुधवारी पहाटे मानकरी व ग्रामस्थ यांच्या मानाच्या पूजा झाल्या. खंडोबा गडावर दिवसभर दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. नाशिक, नगर, संगमनेर, पुणे आदी भागांतून आलेल्या भाविकांची संख्या जादा होती. हातात पेटवलेल्या दिवटय़ा घेऊन भाविकांनी तळी भंडाऱयाचे धार्मिक विधी केले.

मार्गशीर्ष शुद्धप्रतिपदा ते षष्टी या कालावधीत खंडोबाचे घट घराघरात बसवण्यात आले होते. चंपाषष्ठाrला हे घट उठविण्यात आले. चातुर्मास पाळणारे भाविक आजपासून कांदा, लसूण, वांगी खाण्यास सुरुवात करतात. गडावर भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने भंडाऱयाची मुक्त उधळण केली. यावेळी सारे वातावरण भक्तिमय झाले होते.

खंडोबा गडावरून रात्री वाजतगाजत तेलहंडय़ाची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थ व मानकऱयांनी तेल आणून ओतले. रात्री गडावर लाडू, करंजा, अनारसे, पेढे यांचा रुखवत मांडून देवाला मुंडावळ्या बांधण्यात आल्या. त्यानंतर पारंपरिक गाणी म्हणत खंडोबाला लग्नाची तेल-हळद लावण्यात आली. पौष पौर्णिमेला खंडोबाचे लग्न म्हाळसादेवी बरोबर सातारा जिह्यातील पाली येथे होणार आहे. लग्न करून आल्यावर चैत्र पौर्णिमेला वरात निघते, अशी परंपरा आहे. खंडोबा देवस्थानने चंपाषष्ठाr उत्सवानिमित्त खंडोबा गडाला आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने सारा गड उजळला आहे.