जेट आणि जेट कर्मचाऱ्यांना वाचवा…शिवसेनेची सरकारकडे आग्रही मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

जेट एअरवेज कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आहे. सुमारे 23 हजार कर्मचाऱ्यांचे संसार त्यामुळे उघडय़ावर पडले आहेत. जेट एक देशातील नामांकित विमान कंपनी असून या कंपनीला आणि पर्यायाने कर्मचाऱ्यांना सरकारने सर्व ताकद पणाला लावून वाचवावे,अशी आग्रही मागणी शिवसेनेने आज केली.

जेट एअरवेजचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेट कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. जेटच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरही या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले होते. जेट एअरवेज अचानक बंद पडली तर हजारोंचे संसार उघडय़ावर पडतील, हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जेटच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने सूत्रे हलवली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खासदार व भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व केंद्रीय विमान वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांची भेट घेऊन, जेट वाचवा आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्या, अशी आग्रही मागणी केली.

या शिष्टमंडळात खासदार कृपाल तुमाणे, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे तसेच भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, अजित साळवी, संजय चाळके, संजय कदम, जेट एअरवेजच्या निधी चाफेकर व अमित केळकर यांचा समावेश होता.

जेटचे ऑफिस एअरपोर्ट ऑथोरिटीने बंद केले आहे तसेच पासेसही देणे बंद केले आहे, त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाचे काम देशातील इतर विमान कंपन्या सक्षम नसल्याने विदेशी विमान कंपन्यांना मिळत आहे. त्यामुळे दरमहा एक हजार कोटींचे नुकसान होत आहे, याकडे या शिष्टमंडळाने निर्मला सीतारामन व पुरी यांचे लक्ष वेधले. बॅंकिंग प्रकिया ही वेळकाढू आहे. त्यामुळे स्पाईसजेटसारख्या कंपनीला यापूर्वी सरकारने सहा महिने क्रेडिट दिले होते. तशीच सवलत जेट ला द्यावी आणि कर्मचाऱ्यांचे संसार वाचवावेत, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.

अर्थमंत्र्यांचे आश्वासन

जेटचे उच्चाटन करण्यापेक्षा ती कंपनी पुन्हा कशी उभारेल आणि कर्मचाऱ्यांचे संसार पुन्हा कसे उभारतील या दृष्टीने सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. त्यावर यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन निर्मला सीतारामन व हरदीप पुरी यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.