
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय सध्या पर्यटकांना प्रत्यक्ष भेटीसाठी खुले नसले तरी ‘ऑनलाइन सफारी’ला देशविदेशातील पर्यटकांची पसंती मिळत आहे. यासाठी खास सुरू केलेल्या ‘मुंबई झू’ ऍपच्या माध्यमातून फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, यू टय़ूबवर शेकडो पर्यटक दररोज भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेत आहेत. संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी ही माहिती दिली.
मुंबईत पुन्हा वेगाने रुग्णवाढ सुरू झाल्याने उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. मात्र सध्या ऑनलाइन सफारीची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने देशविदेशातील पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध झाली असल्याची माहिती जीवशास्त्रज्ञ अभिषेक साटम यांनी दिली. हा उपक्रम नागरिकांना पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. यामागे महसूल किंवा पैसे गोळा करणे हा उद्देश नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमाला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले.
प्राणी, पक्षी, झाडे, कीटक, फुलांची माहिती
ऑनलाइन सफरीच्या उपक्रमात फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, यू टय़ूबवर उद्यान-प्राणिसंग्रहालयातील प्राणी, पक्षी, झाडे, कीटक, फुलपाखरे, फुले यांची सविस्तर माहिती देण्यात येत आहे. याशिवाय उद्यानात राबविण्यात येणाऱया राष्ट्रीय उपक्रमांची माहितीही दिली जात आहे. सद्यस्थितीत उन्हाळ्यात प्राणी-पक्ष्यांसाठी करण्यात आलेल्या गारेगार सुविधा पाहून पर्यटक आकर्षित होत आहेत. कोरोना असल्याने घेण्यात येणारी खबरदारी आणि करण्यात येणाऱया उपाययोजना पाहून पर्यटक समाधान व्यक्त करीत आहेत.


























































