‘हे सगळं ठरलेलं असावं, मी तिला बाजूला केलं नसतं तर…’, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना विनयभंगाच्या प्रकरणात दिलासा मिळाला असून कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर आव्हाड यांना जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत एक खळबळजनक दावा केला आहे.

आव्हाड म्हणाले, जामीन मिळाल्याचा मला अजिबात आनंद झालेला नाही. 354 चा गुन्हा माझ्या जिव्हारी लागला आहे. कळव्यात जो कार्यक्रम पार पडला त्यावेळी संपूर्ण गर्दीत फक्त एकच स्त्री होती. मी मुख्यमंत्र्यांना भेटून एका बाजूने पुढे निघालो. मी एका साईडला श्रीकांत शिंदे यांना ढकलून मागच्या बाजूला गाडीकडे पाठवले.

मी पोलिसांना पार करून पुढे आलो. मी त्यावेळी गाडीला चिकटलो होतो. तेव्हा त्या बाई मुद्दाम माझ्या समोरुन चालत आल्या. तिच्या मनात हे सगळे ठरलेले असावे. कारण मी तिला बाजूला केले नसते तर ती माझ्या अंगावर पडली असती. मग त्या बाईंनी आरोप केला असता जितेंद्र आव्हाड स्वत:हून माझ्या अंगावर आले. नंतर माझ्यावर एक मोठा गुन्हा दाखल झाला असता. पण मला देवाने बुद्धी दिली आणि मी तिला बाजूला केले. मला अडकवण्यासाठी हे सगळे रचले होते. पण देवाने मला वाचवले, असे आव्हाड म्हणाले.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे

माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी तो व्हीडिओ बघायला पाहिजे होता. ती महिला स्वत: म्हणते माझा अपमान झाला, मला राग आला. मग माझ्यावर कलम 354 लावण्यासाठी हे निकष आहेत का? काही न वाचता फक्त गुन्हे दाखल केले जातात. मला पोलिसांची एक गोष्ट आवडते. कारवाई करताना त्यांना काही विचारले की, ते म्हणतात, साहेब काय सांगू ओ तुम्हाला, तुमचे आणि आमचे संबंध किती चांगले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. पण वरुन खूप दबाव आहे, असे पोलिसांकडून सांगितले जाते. हवालदार, सब इन्स्पेक्टर, इनस्पेक्टर, एसीपी, डीसीपी, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त अगदी पोलीस आयुक्तांना विचारलं तरी प्रत्येक अधिकारी आमच्यावर वरून दबाव आहे, असे सांगतो. कायदा बाजूला ठेवावा लागतो, अशाप्रकारचा दबाव कोण टाकत आहे, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

मला तडीपार करण्याचा डाव

दरम्यान, माझ्यावर विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आता संबंधित महिलेला माझ्या नावाने धमकीचे खोटे फोन केले जात आहेत. माझ्यावर 5 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करून माझ्याविरुद्ध तडीपारीची नोटीस काढायची, असा डाव सध्या शिजत असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.