भूमिपूत्रांना नोकर्‍या द्या, नसता जीएसटी परतावा रोखू, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा कंपन्यांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

“औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग उभारणीसाठी राज्य सरकार उद्योजकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देते, सरकारने ठरविलेल्या उद्योग धोरणानुसार ८० टक्के स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. या धोरणाचे पालन होणे आवश्यक आहे, मात्र या धोरणाचे पालन होत नसेल तर जीएसटी परतावा रोखला जाईल”,  असा खणखणीत इशारा शिवसेना नेते, महाराष्ट्राचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी दिला. महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाच्या पुढाकाराने आज शनिवारी  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा  चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील कलाग्राममध्ये आयोजित केला होता. मेळाव्याचे उद्घाटन सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे होते. याप्रसंगी आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले,  उद्योजक राम भोगले आदींची उपस्थिती होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थानिकांना न्याय देण्यासाठी लढा दिला, हे स्पष्ट करून उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले,  औद्योगिक क्षेत्रात कंपन्या उभारण्यासाठी सरकार उद्योजकांना  जागा, वीज, रस्ते, पाणी यासह अन्य सुविधा उपलब्ध करून देते, त्यांनी उद्योग उभारावेत, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असेच धोरण राज्य सरकारचेही आहे. या धोरणानुसार ८० टक्के स्थानिकांना रोजगार देणे आवश्यक आहे,  मात्र अलीकडे धोरण पाळले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. असे होत असेल तर उद्योजकांना दिल्या जाणार्‍या जीएसटी परताव्याचा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अंतर्गत शेंद्रा, बिडकीन औद्योगिक परिसरात अनेक नव-नवीत उद्योग येत आहेत. त्यामध्ये संरक्षण साहित्य बनविणार्‍या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांतर्गत बिडकीनमध्ये १५ ते २० नवीन उद्योग उभारले जाणार आहेत. येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. संभाजीनगरात होत असलेला हा सहावा मेळावा आहे. अशा प्रकारच्या मेळाव्यातून आतापर्यंत  १० हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. संभाजीनगरातील मेळाव्यातून तरुणांना संधी मिळणार आहे, असे देसाई म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी केले. मेळावा आयोजनामागची भूमिका त्यांनी विषद केली. राज्यभर अशाच प्रकारचे ठिकठिकाणी मेळावे घेऊन तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेमुळे भूमिपुत्रांना न्याय मिळत आहे, काही कंपन्या स्थानिकांना डावलण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांनी सरकारच्या धोरणानुसार रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे,  अशी भूमिका मांडली. यावेळी सुप्रसिध्द उद्योजक राम भोगले, आमदार संजय शिरसाट यांची भाषणे झाली. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत सहसंचालक प्रवीण देशमुख, सदाशिव सुरवसे,  सोहम वायाळ यांनी केले.  मेळाव्यास मोठ्या संख्येने बेरोजगार तरुण-तरुणींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.