अपंगत्व आल्यासही नोकरी कायम राहील! एसटी महामंडळाचा कर्मचाऱयांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य परिवहन सेवेत असताना अपघातामुळे अपंगत्व आल्यास अशा कर्मचाऱयांना सेवानिवृत्त न करता महामंडळ त्यांचा आयुष्यभर सांभाळ करणार आहे. अशा कर्मचाऱयांना करण्यायोग्य नोकरी नसेल तर महामंडळ त्यांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेणार आहे.

ज्या कर्मचाऱयाला अपंगत्व आलेले आहे अशा कर्मचाऱयाची वैद्यकीय तपासणी व अपंगत्वाचा दाखला आदींची पूर्तता चार आठवडय़ांच्या मुदतीत करून घेण्यात येणार आहे. तसेच अपंगत्व आलेल्या एसटी कर्मचाऱयांकडून प्राप्त झालेल्या अपंगत्वाच्या दाखल्याची खातरजमा करून सत्यतेची पडताळणी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्याच्या दिनांकापासून दोन आठवडय़ांच्या मुदतीत करण्यात यावी असे आदेशच महामंडळाने सर्व विभागांसाठी काढले आहेत. अपंगत्वाच्या दाखल्याची खातरजमा केल्यानंतर हा दाखला योग्य असल्याचे आढळून आल्यास परिवहन महामंडळ त्यांना पर्यायी नोकरी देणार आहे.

अधिसंख्य पदावर नियुक्ती होणार

जे कर्मचारी वैद्यकीयदृष्टय़ा कोणतेही काम करण्यास अपात्र असतील किंवा समकक्ष पद उपलब्ध नसल्यास त्यांची नियुक्ती ‘अधिसंख्य’ पदावर होणार आहे. या पदांमुळे त्यांना इतर कर्मचाऱयांप्रमाणे निवृत्तीवेतन व पीएफ आदी फायदे जरी मिळणार नसले तरी त्यांचे वेतन अखेरपर्यंत मिळत राहील अशी तजवीज करण्यात आली आहे. विकास केंग व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व राज्य परिवहन महामंडळ या रिट याचिका क्र. 9762/2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे सुधारित आदेश महामंडळाने काढले आहेत.