
नोकऱ्या महाराष्ट्रात, परंतु भरती परप्रांतीयांची केली जातेय, रेल्वे महामंडळाच्या भरतीत एकही मराठी मुलगा नाही, आयकर विभागातील 1200 पैकी केवळ 3 पदे मराठी युवकांना मिळाली आहेत. हा मराठी तरुणांवर अन्याय असून केंद्र सरकारला महाराष्ट्रात उत्तर हिंदुस्थानींची कार्यालये थाटायची आहेत काय? असा सवाल शिवसेनेने केंद्र सरकारला केला आहे.
शासकीय नोकरी महाराष्ट्रात, पण त्यात एक टक्काही मराठी तरुणांना संधी नसल्याचे उघड झाल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. याप्रकरणी रेल्वे महामंडळाला पत्र लिहून सावंत यांनी जाब विचारला आहे. शासकीय नोकरीत, रेल्वे भरतीत एक टक्काही मराठी मुलांना स्थान नाहीत. मुंबईत यांना मराठी मुले मिळत नाहीत. हा भूमिपुत्रांवर अन्याय असून महाराष्ट्रात नोकरीत मराठी माणसाला, भूमिपुत्राला प्राधान्य द्या, अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी असल्याकडेही सावंत यांनी लक्ष वेधले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एक जाहिरात दिली. या जाहिरातीत कंत्राटी पद्धतीने नोकरभरती केली जाणार होती. त्यासाठी 15 जागा भरल्या जाणार होत्या. 20 मुले आली आणि त्यापैकी 12 जागा भरल्या गेल्या. सगळय़ा जागा बघा, यातला एकही उमेदवार मुंबईचा नाही, महाराष्ट्राचा नाही. आयकर विभागातही हेच सुरू आहे. 1200 उमेदवारांमध्ये फक्त तिघे मराठी आहेत. अशा प्रकारे भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले जात असून याविरोधात रेल्वे महामंडळाला पत्र लिहून एकही मुलगा मराठी का नाही, याचे उत्तर सावंत यांनी मागितले आहे.
मराठी येत नसणाऱ्यांची मुंबई रेल्वेत भरती
मराठी अवगत नसलेल्या लोकांना मुंबई रेल्वेमध्ये भरती केले जात असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे. ही परप्रांतीयांना केंद्र सरकारने दिलेली देणगी असून रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री आहेत, परंतु त्यांना किती अधिकार आहेत हे माहीत नाही, याकडेही अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्रावर अन्याय
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मुख्यालयासमोर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी मान्य करण्यात आली, परंतु अजूनही पुतळा बसवण्यात आलेला नाही. असे धोरण आमच्याकडे नाही असे उत्तर रेल्वेने दिले. यावरून महाराष्ट्रावर कसा अन्याय सुरू आहे हेच दिसत असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे.


























































