अमेरिका निवडणुकीत ‘सातारा पॅटर्न’, पाऊस, वारा आणि बायडेन यांची प्रचारसभा

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहचला असतानाच फ्लोरिडा येथे महाराष्ट्रातील सातारा पॅटर्न पाहायला मिळाला. गेल्या वर्षी सातारा येथे भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा प्रचंड गाजली होती. फ्लोरिडात डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांची गुरूवारी पावसात सभा झाली. अमेरिकेतही आता परिवर्तन होणार का? विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होणार का? याचीच चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे.

डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पावसात झालेल्या प्रचार सभेचा फोटो शेअर केला आहे. ‘वारा-वादळे येतील आणि जातील पण नवा दिवस येईल’ अशी कॅप्शन बायडेन यांनी फोटोला दिली आहे.

अमेरिकन नागरिकांची मने जिंकली

फ्लोरिडात ज्यो बायडेन यांचे भाषण सुरू असताना अचानक पाऊस आणि जोराचा वारा सुरू झाला. सभेला आलेले लोक आपल्या कारमध्ये बसले आणि तेथूनच बायडेन यांचे भाषण ऐकले. बायडेन यांनी मात्र भरपावसात भाषण केले. बायडेन यांनी अमेरिकन जनतेचे मन जिंकले अशा प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटत आहेत. त्यांच्या ट्विटला लाखोंनी लाईक आणि रिट्विट केले आहे. 4 नोव्हेंबरला महासत्ता अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. बायडेन आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळते. पावसातील सभेने अमेरिकेत परिवर्तन घडते का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

… आणि 18 ऑक्टोबर 2019 ची शरद पवार यांची सभा

बायडेन यांच्या पावसातील सभेने गेल्या वर्षीची सातारा येथील सभेची आठवण अवघ्या महाराष्ट्राला आणि देशाला झाली. विधानसभेबरोबरच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 18 ऑक्टोबर 2019 रोजी सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होती. शरद पवार भाषणाला उभे राहताच जोरदार पाऊस आला. पावसाची तमा न बाळगता झालेले पवारांचे भाषण प्रचंड गाजले. या सभेने सातारा आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडले.

आपली प्रतिक्रिया द्या