जो रूट ऑगस्टचा सर्वोत्तम क्रिकेटपटू, महिला गटात आयर्लंडच्या एमियरची बाजी

हिंदुस्थानविरुद्धच्या कसोटी मालिकेत तीन शतके ठोकणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूट ‘आयसीसी’चा ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला. महिला गटात आयर्लंडची एमियर रिचर्डसन या पुरस्काराची मानकरी ठरली. जो रूटने सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीत हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांना मागे टाकले.

जो रूटने हिंदुस्थानविरुद्धच्या कसोटी मालिकेत 4 सामन्यांतील 7 डावांत 94.00च्या सरासरीने 564 धावा फटकावल्या. त्याने पहिल्या तीन कसोटींत तीन शतके झळकावली. जसप्रीत बुमराहने या मालिकेत प्रभावी गोलंदाजी केली. त्याने चार कसोटींत 18 बळी टिपले. ओव्हरमधील चौथ्या कसोटीत बुमराहने दुसऱया डावात जबरदस्त स्पेल टाकून सामना हिंदुस्थानच्या बाजूने झुकवला होता.

पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 18 बळी टिपले होते. दुसऱया कसोटीत त्याने 10 फलंदाज बाद करण्याचा पराक्रम केला होता. अशी कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा चौथा युवा गोलंदाज ठरला होता. मात्र सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जो रूटलाच मिळाला. जो रूटने सातत्यपूर्ण फलंदाजीच्या जोरावर ‘आयसीसी’च्या फलंदाजी क्रमवारीत न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनला पिछाडीवर टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या