
कालिना विधानसभा मतदारसंघातील हलाव पुलाच्या डोंगराळ टेकडीवर संरक्षण भिंती बांधण्यासाठी आणि झोपडय़ांच्या स्थलांतरासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधासभेत दिले.
शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी या प्रलंबित प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, कालिना विधानसभा मतदारसंघात कुर्ला पश्चिमेला हलाव पूल नावाची एक डोंगराळ टेकडी आहे. टेकडीच्या वरती आणि खालीही घरे आहेत. दोन वर्षांपूर्वी तेथे दरड कोसळून एक महिला मृत्युमुखी पडली होती. तेव्हापासून आम्ही संरक्षण भिंत बांधण्यासाठी अनेक प्रयत्न केले. महापालिकेकडून प्रस्ताव पाठवला होता. सर्व परवानग्या मिळाल्या. मी संरक्षण भिंतीसाठी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. पण अजूनही कोणताही निधी दिलेला नाही. महानगर पालिकेने या झोपडय़ांचे स्थलांतर करण्यासाठी प्रस्तावही तयार केला आहे. त्यासाठी जागाही निश्चित केली आहे. पण निधीअभावी काम रखडले आहे. आपण हा निधी देणार आहात का आणि किती दिवसात देणार, असा सवाल संजय पोतनीस यांनी केला. त्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी निश्चितपणे तपासून कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.




























































