
मध्य प्रदेशातील भाजपचे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘बॅकबेंचर’ टिप्पणीवर पलटवार केला. मी काँग्रेसमध्ये होतो त्यावेळी जर राहुल गांधींनी अशी चिंता केली असती तर आज परिस्थिती वेगळी असती. आता मला वाटते की राहुल यांनी स्वतःची चिंता करावी, माझी काळजी करू नये. माझी चांगली प्रगती झालीय, अशा शब्दांत ज्योतिरादित्य यांनी राहुल यांना उत्तर दिले.
सोमवारी युवा काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी ज्योतिरादित्य शिंदेंना डिवचले होते. ज्योतिरादित्य काँग्रेसमध्ये असते तर कधीच मुख्यमंत्री बनले असते. भाजपात ते ‘बॅकबेंचर’ बनलेत. त्यांना काँग्रेसमध्ये घरवापसी करावीच लागेल, असा दावा राहुल यांनी केला होता. त्यावर ज्योतिरादित्य यांनी मंगळवारी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मला राहुल गांधींच्या विधानाकर भाष्य करणे योग्य वाटत नाही. जीवनात प्रत्येक गोष्टीची एक पातळी असते. मागील वर्षभरात मी विशिष्ट पातळी गाठली आहे. मी नेहमीच पातळीच्या वर उभा राहिलो आहे, असा टोला ज्योतिरादित्य यांनी लगावला.
नरोत्तम मिश्रा यांचाही राहुल यांच्यावर निशाणा
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल जर कुणाला मुख्यमंत्री बनवू शकत असतील तर त्यांनी राजस्थानात हा प्रयोग करावा आणि सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवावे. जे लोक दोन वर्षे काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष नेमू शकत नाहीत, ते मुख्यमंत्री बनवण्याच्या गोष्टी करताहेत, अशा शब्दांत मिश्रा यांनी राहुल यांच्या विधानाचा समाचार घेतला.



























































