
मुंबईतील प्रथम श्रेणीतील आघाडीच्या 16 संघांचे द्वंद्व हिंदुहृदयसम्राट चषकासाठी 19 जानेवारीपासून लोअर परळ येथे मॅटवर रंगणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना शाखा क्र. 198 पुरस्कृत यंग विजय क्रीडा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून या स्पर्धेचे 22 जानेवारीपर्यंत दिमाखदार आयोजन केले जाणार आहे. दै. ‘सामना’ या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहेत.
लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावर फिनिक्स मिलच्या शेजारी असलेल्या मैदानात मॅटवर खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना विजय नवनाथ विरुद्ध नवोदित असा होईल. या स्पर्धेत बंडय़ा मारुती, वीर संताजी, विजय क्लब, विजय बजरंग, लायन्स क्लब, शिवनेरी, गोल्फादेवी, ओम् पिंपळेश्वर, गुड मॉर्निंग, दत्तगुरू, जय भारत, श्री राम विश्वस्त, एसएसजी आणि अमर हिंद आपले कौशल्य पणाला लावतील.
ही स्पर्धा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आयुर्विमा स्थानीय लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष दिनेश बोभाटे, शाखाप्रमुख दीपक बागवे आणि युवासेनेचे शाखाधिकारी नितीन शिरोडकर यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने आयोजित केली जाणार आहे.
एकापेक्षा एक तुल्यबळ संघ असलेल्या या स्पर्धेत विजेत्या संघाला रोख 50 हजार रुपये आणि हिंदुहृदयसम्राट चषकाने सन्मानित केले जाईल. उपविजेता संघही 30 हजारांचा मानकरी ठरेल. उत्कृष्ट चढाई-पकडीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे इनाम दिले जाईल तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू 10 हजार रुपयांचा मानकरी ठरेल.

























































