
पिढीजात कुंभार व्यवसाय असूनही त्यांच्या चार पिढय़ांचा मातीला स्पर्श नाही. मात्र, सिद्धहस्त कौशल्याच्या बळावर मातीच्या गोळ्याला आकार देत प्रदीप कुंभार व वर्षा कुंभार या दाम्पत्याने पॉटरीतील आपली गुणवत्ता सिद्ध केली. पर्यावरणपूरक असलेल्या कुंभार दाम्पत्याच्या ‘करडय़ाळ पॉटरी’ला आज विदेशात मोठी मागणी आहे.
कागल तालुक्यात कापशी खोऱयातील करडय़ाळ या गावातील या दाम्पत्याने स्वतःच्या व्यवसायातून इतरांसाठी मोठा रोजगार निर्माण केला आहे. फिरत्या चाकावर चालणाऱया त्यांच्या या परिश्रमाला कोरोनाकाळातही भक्कम आर्थिक आधार मिळत आहे.
करडय़ाळ गावातील कुंभार समाजाने स्वातंत्र्यलढय़ात दिलेल्या योगदानामुळे त्यांना त्याकाळी शंभर एकर जमिनीचा भूखंड मिळाला. त्यामुळे व्यवसायाने शेतकरी झालेल्या या समाजाचे हात मातीत मळलेच नाहीत. मात्र, बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रदीप यांनी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथे खादी ग्रामोद्योग केंद्रातून मास्टर पॉटरीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर पुण्यातील एका पॉटरीत नोकरी सुरू केली. परंतु 2011 मध्ये स्वतःचा व्यवसाय करायचा या विचाराने प्रेरित केल आणि पॉटरी व्यवसायची सुरुवात केली. प्रारंभी तोटा सहन करून घरातच छोटय़ा शोभेच्या वस्तू बनविण्यास सुरुवात केली. वर्षा यांनीही तीन महिन्यांतच पतीकडून कौशल्य आत्मसात करत यामध्ये स्वतःची हुकूमत मिळवली. देशातील विविध राज्यांसह सिंगापूर, जपान, दुबई, न्यूझीलंड या देशांमध्ये कुंभार दाम्पत्याने बनवलेल्या मातीच्या कणखर व देखण्या विविध वस्तूंना मोठी मागणी आहे.
नवे काम, कलाकुसर याकडे प्रदीप लक्ष देतात, तर वर्षा चाकावरील काम ते व्यवसायाचा आर्थिक व्यवहार सांभाळतात. दररोज 14 ते 15 तास काम केले म्हणून आता कोरोनाकाळातही आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे वर्षा सांगतात, तर पॉटरीत तयार झालेल्या वस्तू देशी व विदेशी बाजारपेठेत विकण्याचे काम कोल्हापूरच्या व्ही. टी. पाटील फाउंडेशनमार्फत होत असल्याचे प्रदीप सांगतात.
या वस्तू देशाबाहेर गेल्या
तेल न सांडणारा मॅजिक लॅम्प, धातूप्रमाणे वाजणारी मातीची घंटी, विविध आकारांच्या मॉडर्न बाहुल्या, मातीची झुंबर, वॉलपीस, पणत्या, चहाचे कप, पाण्याचा जग, थंड पाण्यासाठी बाटली, जेवणासाठीची भांडी ते पेपरवेटपर्यंत अनेक वस्तू.
अशी तयार केली जाते पॉटरी
मातीच्या वस्तू टिकाऊ व आकर्षक होण्यासाठी त्यात तीन प्रकारची माती मिसळली जाते. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथील विशिष्ट प्रकारची माती, तळ्यातील गाळाची व काळी माती यातून पॉटरीसाठी मिश्रण तयार केले जाते. त्याला यंत्रांच्या व हाताच्या साह्याने आकर्षक आकार देणे, आकार दिलेल्या वस्तूंना वाळवणे व भट्टीत भाजणे यासाठी आठ दिवसांची मेहनत लागते. तसेच, इलेक्ट्रिक व्हील, माती मिक्सर, माती मळणी यंत्र, हायड्रॉलिक प्रेस मशीन, आधुनिक गॅस भट्टी व ड्रायर या आधुनिक साधनांची जोड दिल्याने तयार झालेल्या वस्तू अधिकच आकर्षक व प्रमाणबद्ध होतात.
व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या स्वयंप्रेरिका विभागामार्फत दोन वर्षांपासून करडय़ाळ पॉटरीच्या वस्तू परदेशी विकत आहोत. वस्तूंचा दर्जा उत्तम असून, नाविन्यता असल्याने त्यांना मोठी मागणी आहे. स्थानिकही आमच्याकडून या वस्तू विकत घेऊन परदेशी पाठवतात.
– जयश्री गायकवाड, अध्यक्षा, स्वयंप्रेरिका संस्था


























































