वटवाघळाने दिला कल्याणकरांना ‘शॉक’

20


सामना प्रतिनिधी। कल्याण

मुसळधार पावसात आसरा शोधताना वटवाघूळ विजेच्या तारेवर अडकल्यामुळे वीजपुरवठा अडीच तास खंडित झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली. विशेष म्हणजे या दुर्घटनेत वटवाघूळ गंभीररीत्या भाजूनही त्याला वाचवण्यात प्राणिमित्रांना यश आले.

ठाणकर पाडा परिसरात सायंकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाला. विजेच्या तारेचा स्फोट होत वीजपुरवठा खंडित झाला. नेमकी वीज कशामुळे गेली याचा शोध घेण्यात एक तास गेला. अखेर एका ठिकाणी तारेवर वटवाघूळ अडकल्याचे आढळून आले. मात्र जोपर्यंत हे वटवाघूळ काढले जात नाही तोपर्यंत दुरुस्ती करता येणार नसल्याचे महावितरणच्या कर्मचाऱयांनी सांगितले. यामुळे अग्निशमन अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. मात्र कोणता पक्षी आहे याची कल्पना येत नसल्यामुळे जवानांनी पक्षीमित्र सुहास पवार यांना मदतीला घेतले. वॉर रेस्क्यू फाऊंडेशनच्या तरुणांनी तत्काळ धाव घेत या वटवाघळाला विजेच्या तारेतून सोडवत तत्काळ उपचारासाठी दाखल केले. गंभीररीत्या भाजलेल्या वटवाघळावर वेळेत उपचार केल्यामुळे त्याचा जीव वाचल्याचे डॉ. रायभोळे यांनी सांगितले. या सर्व गदारोळात मात्र नागरिकांना अडीच तास अंधारात राहावे लागले.

आपली प्रतिक्रिया द्या