
सामना प्रतिनिधी । मुंबई
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लोअर परळच्या कमला मिलमधील हॉटेल्स, पब्स आणि चटपटीत नावाची आणि खाणपानाची सेवा देणारी छोटेखानी रेस्टॉरंट सजली आहेत. दाराजवळ थोरामोठय़ांचे स्वागत करणारे विविध रंगसंगतीमधील सांता, जिंगल्सबेल्स टांगलेले आहेत. मात्र, गेल्या वर्षी 29 डिसेंबर मिलमध्ये अग्निकांड होऊनही आजही अग्निसुरक्षेच्या नावाने पुरती बोंब आहे. वर्ष होऊन मिलमधील व्यावसायिकांनी योग्य तो धडा घेतला नाहीच, अशीच आताची परिस्थिती आहे.
29 डिसेंबर 2018 ला मध्यरात्री कमला मिलमधील मोजो’स बिस्रो आणि वन अबव्ह रेस्टॉरंट-पबमधील अनधिकृतपणे केलेल्या बांधकामांमुळे आणि हुक्का पार्लरमुळे लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. त्यात तरुण-तरुणीच जास्त होत्या. या घटनेला वर्ष होत आले तरी त्यापासून मिलमधील विविध व्यावसायिकांनी घेतलेला नाही. आजही कमला मिलमधील व्यावसायिकांनी अग्निसुरक्षा, मार्गातील अडथळे आणि नवीन बांधकामे सुरूच ठेवली आहेत.
आक्षेपानंतरही सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत
2018 च्या अग्निकांडानंतर अग्निशमन दलाने मिलमधील प्रत्येकाची झाडाझडती घेतली होती. पण तरीही आज मिलमधील ‘ट्रेड व्हिव्ह’मध्ये असणाऱया 98पेक्षा जास्त पब आणि रेस्टारंटमध्ये आग लागल्यावर बाहेर सुरक्षित पडण्यासाठी जागाच नाही. ट्रेड व्हिव्हमधील (पूर्वीचे व्हिटोरिया) पाठीमागे अन्नपदार्थ घेऊन जाण्यासाठी असणाऱया लोखंडी शिडय़ाच आपत्कालीन वेळी बाहेर पडण्याचे मार्ग आहेत. अनेक व्यावसायिकांनी पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून तात्पुरत्या शेडऐवजी कायमस्वरूपी शेड उभारले आहेत.
ट्रेड हाऊस की हाऊस गल्ली?
‘मोजो’स बिस्रो आणि वन अबव्ह हे दोन रेस्टारंट व पब ट्रेड हाऊसमध्ये होते. आज ते बंद आहेत. पण या इमारतीच्या पायऱया आणि बाजूबाजूला रॅबिट आणि सिमेंटची पोती रचून ठेवलेली आहेत. त्याला लागून ‘लंडन टॅक्सी’ हा पब आणि रेस्टॉरंट आहे. मात्र, त्याचे सामान अगदी सिलिंडर्ससह बाहेर आहे. त्याला लागून कचऱयाच्या मोठय़ा पेटय़ाही बाहेर ठेवण्यात आल्या आहेत. याच इमारतीच्या कोपऱयावर सिमेंटचा मोठा ढिग रचून ठेवण्यात आला आहे. त्याला लागून मोठी क्रेनही आहे. आजूबाजूला पंचतारांकित रेस्टॉरंट-पब आणि इमारती असताना हे बांधकामाचे साहित्य मधेच रचून ठेवले आहे. त्यामुळे पुन्हा आग लागली तर बाहेर पडताना ग्राहकांना मोठय़ा अडथळय़ांना पार करून बाहेर पडावे लागेल.
अग्निशमन दलाची विशेष मोहीम
सणासुदीच्या काळात सुट्टी असल्यामुळे मॉल, पब-रेस्टॉरंट तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी लोक आपल्या कुटुंब कबिल्यासह बाहेर पडतात. अशा वेळी आगीच्या घटना रोखण्यासाठी आणि तपासणीसाठी मुंबई अग्निशमन दल कालपासून एक विशेष मोहीम राबवत आहे. त्याअंतर्गत गर्दीची ठिकाणे, मल्टिफ्लेक्स, मॉल, हाय फुड रेस्टॉरंटमध्ये जाऊन अग्निसुरक्षेची तपासणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख पी. एस. रहांदळे यांनी दिली.
अंतर्गत बांधकाम की सजावट?
मिलमधील अनेक रेस्टॉरंट-पब, व्यावसायिक इमारती आणि गाळय़ांमध्ये छुप्प्या मार्गाने बांधकाम सुरू आहे. काही जणांवर पालिकेने आक्षेप घेतल्यामुळे बाहेरून बंद करण्यात आले आहे. मात्र, इमारतीच्या आतून बांधकाम सुरूच आहे. अंतर्गत सजावटीच्या नावाने इमारतीच्या मूळ गाभ्यालाच हात लावल्याचा प्रकार या आधीही इथे घडला आहे.
कमला अग्निकांडाला वर्ष होत आहे. त्यात 14 जणांचे बळी गेले. आज तेथे स्मशान शांतता हवी होती, परंतु तेथे वर्ल्ड ऑफ द ड्रिंक नावाचा एशियातील सर्वात मोठय़ा बारचे या घटनेनंतर पदार्पण झाले. कोणाला कसलीच भीती राहिली नाही. रात्री मद्याचे ग्लास भरले जातात. सिगारेटचा धूर सोडला जातो. गाण्यावर ठेका धरत तरुणाई मद्यधुंद होते. बळी गेलेल्यांना अशा प्रकारची श्रद्धांजली दिली जाते ही बहुदा त्यांची संस्कृती असावी.
– अभिजित पाटील, दक्ष नागरिक



























































