1 कोटी 20 लाख डोससाठी कोल्ड स्टोरेज सेंटर सुरू, कांजूरमार्गमध्ये परिवहनमंत्री, महापौरांच्या हस्ते उद्घाटन

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे दिवसाला 50 हजारपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण सुरू असताना कांजूरमार्ग येथे पालिकेचे 1 कोटी 20 लाख डोस साठवण क्षमता असलेले कोल्ड स्टोरेज सेंटर मंगळवारपासून सुरू झाले. परिवहनमंत्री अॅड. अनिल परब आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. सेंटरमध्ये वॉक इन कुलर, साठवण बॉक्स, लस केंद्राची साठवण क्षमता मोठी असल्यामुळे मुंबईकरांचे पुढील 50 वर्षांचे टेन्शन मिटले आहे, असा विश्वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य आणि मुंबई महापालिकेतर्फे कठोर उपाययोजना सुरू असून सोमवारपासून काही निर्बंध वाढवण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोना चाचण्या आणि लसीकरणात मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. कोरोना लसीकरणासाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूटकडून कोव्हिशिल्ड तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या लसींचा साठा राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला केला जात आहे. कोरोनावरील या लसींचा साठा करण्यासाठी अद्ययावत असे कोल्ड स्टोरेज सेंटर तयार करण्याचे काम मुंबई महापालिकेकडून डिसेंबरपासून सुरू होते. कांजूरमार्ग पूर्व येथील मामा मिराशी मार्गावरील पाच मजली परिवार इमारतीमधील पहिल्या मजल्यावर हे पेंद्र तीन महिन्यांत युद्धपातळीवर तयार करण्यात आले असून त्याचे आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्य समिती अध्यक्षा प्रवीणा मोरजकर, ‘एस’ आणि ‘टी’ विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा दीपमाला बढे, नगरसेविका सुवर्णा करंजे, नगरसेविका सारिका पवार, जागृती पाटील, वैशाली पाटील, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. शीला जगताप, डॉ. अविनाश अंकुश तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सर्व साठा कांजूरमध्ये हलवणार

मुंबईकरांना सध्या लागणाऱया लसींचा साठा पालिकेच्या एफ-दक्षिण वॉर्ड कार्यालयामध्ये तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आला आहे. इथून हा साठा मुंबईतील 108 लसीकरण केंद्रांसाठी वितरित केला जातो. मात्र आता हा साठा सोमवारपर्यंत कांजूरच्या कोल्ड स्टोरेजमध्ये हलविण्यात येणार आहे. त्यामुळे इथली सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येणार असून पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस यांचे संरक्षण या सेंटरला देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या