
मडगावला जाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या एसी डबलडेकर ट्रेनला अडथळा ठरणाऱ्या मध्य रेल्वेच्या 154 वर्षांहून जुन्या कर्नाक पुलावर लवकरच हातोडा पडणार आहे. हा पूल खंगला असून तो धोकादायक स्थितीत असल्याने जुलैअखेरीस वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन पाडण्यात येणार आहे.
सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकादरम्यान कर्नाक पूल असून तो अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने लवकरात लवकर पाडण्यासाठी मध्य रेल्वेने वाहतूक सहपोलीस आयुक्तांना विनंती केली आहे. मुंबई महानगरपालिकेने हँकॉक पुलाला सुरू करताच कर्नाक पूल पाडण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे जुलैअखेरीस हा पूल वाहतुकीसाठी संपूर्णपणे बंद होणार असून सुरुवातीला लोकल वाहतुकीला बाधा न आणता छोटे ब्लॉक घेऊन पाडकाम सुरू केले जाणार असून चार महिन्यांनंतर मोठा ट्रफिक व पॉवर ब्लॉक घेऊन हा पूल तोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबईतील जुन्या ब्रिटिशकालीन पुलांचे आयुष्य संपलेले असल्याने त्यांना पाडून त्यांचा पुनर्विकास करण्याचे काम सुरू आहे. परंतु हँकॉक ब्रिज आणि लोअर परळ ब्रिज पाडल्यानंतर त्यांचा पुनर्विकास करण्याचे काम प्रचंड रखडले आहे. त्यामुळे एकीकडे प्रचंड वाहतूककोंडी होत असून दुसरीकडे धोकादायक ब्रिजमुळे रेल्वे प्रवाशांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे.
पश्चिम रेल्वेच्या अंधेरीतील गोखले पुलाची पादचारी मार्गिका जुलै 2018 मध्ये कोसळल्यानंतर मुंबईतील रेल्वे मार्गांवर बांधलेल्या ब्रिटिशकालीन पुलांचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले होते. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेचा लोअर परळ (डिलाईल पूल) उड्डाणपूल पाडण्यात आला. नुकताच लोअर परळच्या उड्डाणपुलासाठी पहिला वेब गर्डर बसविण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये येथे दुसरा आणि अंतिम गर्डर बसविण्यात येणार आहे. त्यानंतर या पुलाचे पालिका हद्दीतील काम वेग पकडणार आहे.
डबलडेकरला ठरतोय अडथळा…
कर्नाक ब्रिज 154 वर्षांचा असून तो मध्य रेल्वेवरील सर्वात जुना पूल म्हणून कर्नाक पूल ओळखला जातो. सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकातील कर्नाक पुलाची निर्मिती 1868 मध्ये झालेली असून त्यास 154 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुलांची उंची सर्वात कमी आहे. तसेच दक्षिण मुंबईतील हे उड्डाणपूल पाडल्याशिवाय रेल्वेवर नव्या तंत्राच्या आधुनिक तसेच जादा प्रवाशांना सामावून घेणाऱया मडगाव डबलडेकरसारख्या ट्रेन चालविणेही अशक्य बनले आहे.




























































