
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनी केलेल्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये आज मोठी कारवाई करण्यात आली. सांगली आणि मिरजेत वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून 7 देशी कट्टे, 1 किलो 218 ग्रॅम गांजा, 228 नशेच्या नायट्रोव्हेट गोळ्या, 17 जिवंत काडतुसे असा नऊ लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गोष्टींची तस्करी करणाऱया सहाजणांना अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.
सौरभ रवींद्र कुकडे (वय 24, रा. गोल्डन कॉलनी, सांगली), शांताराम वसंत शिंदे (वय 27, रा. आसंगी तुर्क, जत), राहुल सतीश माने (रा. सैनिक वसाहत मिरज), वैभव राजाराम आवळे (वय 25, रा. हडको कॉलनी, मिरज), सुरेश लक्ष्मण राठोड (वय 42, रा. अलियाबाद, ता. विजापूर), सूरज संभाजी महापुरे (वय 25, रा. दिघंची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामागे गावठी कट्टे विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तातडीने पथकाने घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. मिरजेतील माजी सैनिक वसाहत परिसरात सराईत गुन्हेगार राहुल माने हा नशेच्या गोळ्यांची विक्री करीत असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन माने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन कट्टे, पाच जिवंत काडतुसे, तसेच नशेच्या 228 गोळ्या आणि गांजा असा एक लाख 73 हजार 425 रुपयांचा मुद्देमाल आढळला. त्याच्याविरोधात महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिरज रेस्ट हाऊससमोर एक कारमध्ये दोघे बसले होते. पोलिसांनी त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची चौकशी केली. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे कारची तपासणी केली असता, तीन कट्टे आणि सात जिवंत काडतुसे असा एक लाख 81 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल आणि कार जप्त करण्यात आली. विश्रामबाग परिसरात केलेल्या कारवाईत संशयित सूरज महापुरे हा रेल्वे स्थानक परिसरात कट्टा घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्याकडून कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, प्रशांत निशाणदार, राहुल जाधव, संजय कांबळे, सुनील चौधरी, गौतम कांबळे, संकेत कानडे, संदीप नलावडे, प्रकाश पाटील, मेघराज रूपनर, विक्रम खोत या पथकाने ही कारवाई केली.





























































