
कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघा आठवडा शिल्लक असताना राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचारसभांदरम्यान केवळ स्वत:बद्दल बोलतात, मात्र कर्नाटकातील जनता, त्यांचे प्रश्न, विविध राज्यासोबत असलेल्या समस्या याबद्दल मात्र काही बोलत नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर तुफानी हल्ला केला.
कर्नाटकातील तुरुवेकेरे येथे एका प्रचार सभेला संबोधित करताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, ही निवडणूक त्यांच्यासाठी (पीएम मोदी) नाही, तर कर्नाटकातील लोकांसाठी आहे. पंतप्रधान मोदींनी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील पाणीवाटपाचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच्या भूमिकेबद्दल आणि राज्यातील भ्रष्टाचाराचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी काय केले याबद्दल बोलले पाहिजे’, असंही राहुल गांधी म्हणाले.
तसंच पंतप्रधान मोदींना त्यांच्या निवडणूक सभांच्यादरम्यान राज्यातील इतर भाजप नेत्यांबद्दल बोलण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं.
कर्नाटकातील तुरुवेकेरे येथे भाषण करताना राहुल गांधी यांनी अजान दरम्यान आपलं भाषण थोड्यावेळासाठी थांबवलं.
दुसरीकडे, सोमवारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत आज सकाळी 11 वाजता बेंगळुरू येथील पक्षाच्या मुख्यालयात जाहीरनाम्याचं अनावरण केलं.
दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी रविवारी कर्नाटकातील बागलकोट येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर #CryPMPayCM ट्विटरवर ट्रेंडिंग सुरू झालं. सोमवारी विविध पक्षांचे प्रमुख राजकीय नेते सोमवारी राज्यभरातील सभांना संबोधित करणार आहेत.






















































