अक्कलकोटमधून कर्नाटकात जाणारी 88 लाखांची रोकड जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱया एका कारमधून तोळणूर गावाजवळ 88 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सीमावर्ती गावाजवळ सापडलेल्या या रकमेविषयी चर्चा रंगली आहे. जिह्यातील भाजपचे तीन आमदार सचिन कल्याणशेट्टी, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख हे तिघे कार्यकर्त्यांसह सीमावर्ती तालुक्यात प्रचार करण्यात दंग आहेत. त्यामुळे या रकमेविषयी चर्चेला ऊत आला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असून, जिह्यातील भाजपचे नेते व आमदार विजापूर व गुलबर्गा जिह्यांत प्रचारासाठी तळ ठोकून आहेत. सोलापूर जिल्हा कर्नाटक सीमेलगत असून, तोळणूर या गावातून विजापूर जिह्यातील अफझलपूर गाव अक्कलकोट तालुक्यालगतच आहे. तोळणूर व दुधनीचा बहुतांशी व्यापार व व्यवहार या तालुक्याशी निगडित आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. तोळणूर चेकपोस्टवर कर्नाटकात निघालेल्या एका कारला संशयावरून ताब्यात घेत तपासणी केली असता, त्यात 88 लाख रुपयांची रोकड सापडली. चालकाकडे चौकशी केली असता, तो थातूरमातूर उत्तरे देत असल्याने पोलिसांनी रक्कम जप्त करून ट्रेझरीत जमा केली आहे; परंतु या रोकडविषयी प्राथमिक माहितीवरून अद्यापि गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.