
बेळगाव महापालिकेवरील भगवा हटविला, मणगुती येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचा अवमान झाला, वडगाव-शहापूर रस्त्यावरील साई मंदिरासह इतर मंदिरे हटविण्यात आली. यावेळी भाजपचे हिंदुत्व कोठे गेले होते? असा सवाल करीत भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाला बळी पडू नका, असे जबरदस्त आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सीमावासीयांना केले. दरम्यान, सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव करण्यासाठी प्रचाराला येणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
खानापूर येथे झालेल्या सभेनंतर बुधवारी (3 रोजी) रात्री महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव दक्षिण मतदारसंघातील उमेदवार रमाकांत कोंडुसकर, बेळगाव उत्तरचे ऍड. अमर येळ्ळूरकर, बेळगाव ग्रामीणचे आर. एम. चौगुले आणि यमकनमर्डी मतदारसंघातील मारुती नाईक यांच्या प्रचारार्थ खासदार संजय राऊत यांची कारभार गल्ली, वडगाव येथे जाहीर सभा झाली. यावेळी खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या ढोंगी हिंदुत्वावर कडाडून प्रहार केला. खासदार संजय राऊत यांचे सभास्थळी आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
शिवसेना नेहमीच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आजची सभा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विजयाची सुरुवात आहे, असा विश्वास व्यक्त करीत खासदार संजय राऊत म्हणाले, भाजपचे हिंदुत्व बेगडी असून, येथील मराठी भाषिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय केले जात आहेत. मात्र, 10 मे रोजी जनता समितीचा विजय निश्चित करणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार हाच शिवसेनेचा उमेदवार आहे. सभेवेळी वीजपुरवठा नसला, तरी 13 तारखेला समितीच्या विजयानंतर गल्लोगल्ली प्रकाशाचे दिवे उजळतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारासाठी येणार आहेत. त्यावेळी त्यांना विकासकामांच्या नावाखाली जनतेला कशा प्रकारे त्रास दिला जात आहे, हे दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्रातील भाजप नेते सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी बेळगावात दाखल होत आहेत, हे दुर्दैव आहे. जर सीमाभागातील मराठी भाषिकांबद्दल थोडीशी जरी भावनिक सहानुभूती असेल, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगव्याचा पराभव करण्यासाठी सीमाभागात सभा घेऊ नये. त्यांनी सभा घेतली तर मराठी भाषिक जनता त्यांना माफ करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी सीमालढय़ात भाग घेतल्याचे सांगतात. ते जर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला आले, तर शिंदे यांचे ढोंग उघडे पडेल, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.
यावेळी रमाकांत कोंडुसकर यांचे भाषण झाले. ते म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीची शक्ती बघून विरोधकांनी इकडे फिरायचे बंद केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खरे हिंदुत्ववादी असतील, तर त्यांनी ढोंग करणाऱ्यांच्या प्रचाराला येऊ नये, असा इशारा कोंडुसकर यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर आदी उपस्थित होते.
भाजप म्हणजे भ्रष्टाचार धुण्याचे वॉशिंग मशीन!
भाजप म्हणजे भ्रष्टाचार धुण्याचे वॉशिंग मशीन आहे, असे सांगत खासदार संजय राऊत म्हणाले, दुसऱ्या पक्षातील एखादा अमुक-तमुक भ्रष्टाचारी आहे, असे सांगितले जाते. मात्र, तोच भाजपमध्ये गेला की, त्याच दिवशी पवित्र होतो. यावरून भाजपचे कटकारस्थान जनतेला दिसून येत आहे. अयोध्येतील राममंदिर बांधण्यासाठी शिवसेनेने मोठे योगदान दिले आहे. शिवसेना नसती तर राममंदिरच झाले नसते, असे सांगत त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.
पथदिवे बंद करणाऱ्या कानडी प्रशासनाविरोधात संताप
वडगावातील कारभार गल्ली येथील सभेला खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकण्यासाठी परिसरातील जनसमुदाय मोठय़ा संख्येने उपस्थित होता. यावेळी कानडी प्रशासनाने जाणूनबुजून येथील पथदिवे बंद केले होते. यामुळे उपस्थित जनसमुदायाने तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पथदिवे बंद केले म्हणून काही होणार नाही, तर येत्या निवडणुकीत त्यांना हिसका दाखवून तुम्हीच पथदिवे लावा, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी करताच जनसमुदायाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.






























































