भिवरेच्या तीरी पुन्हा भाविकांची मांदियाळी, 4 लाख भाविकांच्या उपस्थितीत कार्तिकीचा सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे दोन वर्ष थांबलेला वारीचा सोहळा, कार्तिकी वारीमुळे पुन्हा सुरु झाला. एकादशीच्या मुख्य सोहळ्यास तब्बल 4 लाख भाविकांनी उपस्थिती लावली. ‘पुंडलिक हरी वरदे’चा गजर करीत लाखो भाविकांनी चंद्रभागेत डुबकी मारली. स्नानासाठी आलेल्या भाविकांमुळे चंद्रभागेचे वाळवंट फुलले असून भाविक भजन, किर्तन व प्रवचनात दंग झाले होते.

कोरोनामुळे कार्तिकी, चैत्री, माघी, आषाढीला भरणारे यात्रा सोहळे रद्द झाले होते. केवळ परंपरा जपण्यासाठी संचारबंदीत मर्यादित स्वरुपात यात्रा साजऱया झाल्या. सध्या कोरोनाचे संकट कमी झाल्याने प्रशासनाने कार्तिकी यात्रा भरवली आहे. यातच एसटी संपामुळे ऐन कार्तिकी यात्रेत भाविकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.

भाविकांना स्नान करण्यासाठी गुरसाळे बंधाऱयातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे चंद्रभागा स्नान करण्यांसाठी भाविकांची मांदियाळी दिसली. मुखदर्शन घेण्यासाठीही सुमारे 70 हजार भाविक दर्शन रांगेत उभे असल्याचे पहायला मिळाले.

मंदिर परिसर, 65 एकर व दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग व भक्तीमार्ग आदी ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रासादिक साहित्य विक्रींच्या दुकानात खरेदीस भाविक चांगला प्रतिसाद देत आहेत. भाविक कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सोशल डिस्टन्स पाळताना दिसत आहेत.