
ढगफुटी आणि भूस्खलनामुळे जम्मू–कश्मीर आणि ईशान्य भारतात एपूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. पूंछ आणि किश्तवाड जिह्यांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून ढगफुटीमुळे अनेक घरांचे तसेच शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. तर, नागालॅण्डमध्येही भूस्खलन झाल्यामुळे मलब्याखाली दबून आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर उत्तराखंडमध्ये वीज कोसळून दोन दगावले.
पूंछमधील सुरनकोट येथे ढगफुटीमुळे काही ठिकाणी भूस्खलन झाले. तेथील मलबा काही घरांवर आला. एका घरातील दोन वर्षांच्या मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत या भागात 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. किश्तवाडमध्ये सुर्नू भागात अनेक घरांचे तसेच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राजारी येथे धारहाल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे पूर आला. त्यात 200 ते 250 गाडय़ा वाहून गेल्या, तर उत्तराखंडमध्ये हरिद्वार येथे वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. उत्तराखंडमध्ये अनेक जिह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
यात्रांवर मुसळधार पावसाचा परिणाम
कश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक भाविक अनेक ठिकाणी अडकले आहेत. उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे केदारनाथ यात्रेतील घोडे आणि खेचर सेवा बंद करण्यात आली. पैलाश-मानसरोवर यात्रेतील एक जथादेखील थांबवण्यात आला. पिथौरागढ येथे भूस्खलन झाले. रुद्रप्रयाग येथे मुसळधार पावसामुळे अलकनंदा नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. डेहराडूनमध्येही मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले.
मुंबईला मुसळधार पावसाचा अलर्ट
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मान्सूनने दमदार पुनरागमन केले आहे. मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मान्सून सक्रिय झाला असून पुढील आठवडय़ात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, गोवा तसेच पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील घाट परिसरात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून या भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अतिशय मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.





























































