
सामना प्रतिनिधी । नगर
केडगाव हत्याकांडाला आता दोन महिने पुर्ण होत असून या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची सीआयडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालयाने याबाबत परवाणगी दिली आहे.
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली़. या प्रकरणी विशेष पथकाने आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर, भानुदास उर्फ बी़एम़ कोतकर, रवि खोल्लम, विशाल कोतकर, संदीप गिजहे, महावीर मोकळे, बाबासाहेब केदार व भानुदास कोतकर या दहा जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर विशेष पथकाकडून हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. पोलीस उपाधीक्षक अरूणकुमार सपकाळे या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत़. सपकाळे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस़एस़ पाटील यांच्याकडे शनिवारी केडगाव हत्याकांडप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दहा जणांची चौकशी करण्याची परवानगी मागितली होती़. न्यायालयाने सीआयडीची ही विनंती मान्य केली आहे़. न्यायालयीन कोठडीत असलेल्या दहा जणांपैकी काही औरंगाबाद तर काही जण नाशिक कारागृहात आहेत़. यामुळे सीआयडी पथकाला कारागृहात जाऊन आरोपींची चौकशी करावी लागणार आहे़.
केडगाव येथील हत्याकांडाला दोन महिने आता पुर्ण होत आहेत. हत्याकांडाचा तपास सध्या सीआयडीकडे आहे. सीआयडीच्या अधिकार्यांनी नगरमध्ये येवून हत्याकांड ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणची पाहणी करुन पोलिसांनी तयार केलेल्या कागदपत्राची माहिती घेवून यापूर्वीचा तपास कशा पध्दतीने केला याची माहिती अधिकार्यांकडून घेतली आहे. सीआयडीचे विशेष पथकसुध्दा या घटनेचा तपास करत आहे. न्यायालयात दोषारोपत्र दाखल करावयाचे असल्याने आता या प्रकरणामध्ये ज्या आरोपींना अटक केली आहे त्यांची चौकशीसुध्दा केली जाणार आहे. तसेच ठुबे व कोतकर कुटुंबीयांनी जी जी पत्रे पोलिसांना दिली आहे. यावरूनसुध्दा तपास केला जाणार असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणामध्ये २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून इतरांच्या अटकेबाबत अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही. सीआयडीपुढे आता तपासाचे आवाहन राहणार आहे.
केडगाव हत्याकांडप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नगरसेवक विशाल कोतकर याने नार्को टेस्ट घेण्यास नकार दिला आहे़ कोतकर हा सध्या नाशिक कारागृहात आहे़ पोलिसांनी गुंजाळ याच्यासह कोतकर याची नार्को टेस्ट घेण्यास न्यायालयाकडे परवानगी मागितली होती़. कोतकर याने मात्र नकार देत आपले लेखी म्हणणे शनिवारी न्यायालयात सादर केले आहे़ याबाबत पुढील सुनावणी ७ जून रोजी होणार आहे़.

























































