सुरक्षित करा आपले स्वीट होम

चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

फोर्ब्सच्या सर्वेक्षणानुसार असे लक्षात येते की, 72 टक्के लोक घराच्या विम्याबद्दल अनभिज्ञ आहेत. म्हणजे फक्त 28 टक्के लोक या विमाप्रकाराविषयी माहिती बाळगतात व त्यातील काही जण आपले घर सुरक्षितदेखील करतात.

ऑफिस, गोडाऊन, फॅक्टरी या सर्व गोष्टी व्यवसायाशी निगडित आहेत व विमा न केल्यामुळे दुर्घटना झाल्यास व्यवसायाची गणिते बिघडतात. त्यामुळे या सर्व गोष्टी सुरक्षित करण्यासाठी व्यावसायिक पुढाकार घेतो, पण स्वतःच्या घराचा विमा क्वचितच करतो. नोकरी करणाऱया लोकांमध्येही घराचा विमा करणाऱयांचे प्रमाण अत्यल्प आहे. तसे पाहायला गेले तर आगीच्या विम्याचा अगदी कमी प्रीमिअम येतो. एक करोडसाठी साधारण 2500/- वर्षाला. तरीही 72 टक्के लोक यापासून अपरिचित आहेत.

आपण कर्ज घेतो तेव्हा कर्ज देणारी संस्था आपल्याकडून घराचा विमा करून घेते, पण तो संपल्यावर मात्र आपण स्वतःहून विमा चालू ठेवीत नाही. घराचा विमा सर्वसाधारण विमा कंपन्यांमार्फत पुरविला जातो. विमा कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी खास हाऊसहोल्डर विमा पॉलिसी पुरवितात. यामध्ये आग, भूकंप किंवा पूर यामध्ये मालमत्तेचे नुकसान झाले तर भरपाई मिळते. किती विम्याचे कव्हर असले पाहिजे हे विभागानुसार पुनर्बांधणीचा खर्च किती येईल यावर निश्चित केले जाते. घरातील सामानासाठी घरफोडीच्या विम्याचे कव्हर असते. दागिने व मौल्यवान वस्तू, इलेक्ट्रिक वस्तूचे ब्रेकडाऊन तसेच अगदी सायकलचा विमादेखील या कॉम्प्रेहेन्सिव्ह पॉलिसीमार्फत करता येतो.

या पॉलिसीबरोबर जर अपघाताने काही नुकसान झाल्यास पर्सनल ऑक्सिडंट कव्हर करता येते. याचबरोबर आपल्या वास्तूमध्ये एखादी व्यक्ती आली व जर त्यांना काही इजा झाली तर पब्लिक लायेबिलिटी हे महत्त्वाचे कव्हर या पॉलिसीमध्ये समावेशक आहे. या पॉलिसी युद्धकाळात नुक्लिअर

बॉम्ब पडल्याच्या काळात महागाईमुळे वस्तूची किंमत कमी झालेली असल्यास व वापरल्यामुळे वस्तू खराब झाल्यास काम करीत नाहीत. आग लागल्यास किंवा चोरी, दरोडा अथवा घरफोडी झाल्यास  पोलीस स्टेशनला तक्रार करून एफआयआर करणे बंधनकारक आहे. नुकसानीची यादी करून विमा कंपनीला कळवायला हवे. या नंतर विमा कंपनी सर्वेयर अपॉइंटमेंट करते. त्याला डॉक्युमेंट दिल्यावर क्लेमची असेसमेंट होते व त्याने दिलेल्या अहवालानुसार क्लेम सेटल होतो. आता तुम्ही स्वतःला प्रश्न करा की, मी माझ्या घराचा विमा केला आहे का? सेंट्रल सबर्बमध्ये एखादे नुकसान झालेले एक हजार स्क्वेअर फिटचे घर बांधायला 30 लाख खर्च येईल. 25 लाख इंटिरिअर, घरातल्या 15 लाखांच्या इलेक्ट्रिकल वस्तू असा जरी 70 लाखांचा ऐवज झाला. उद्या हे जर नुकसान झाले तर नुकसान कुणाचे आहे? त्यामुळे घराचा विमा करणे अत्यंत गरजेचा आहे.

[email protected]