
सामना ऑनलाईन । देहराडून
उत्तराखंड येथील ऋषिकेश या ठिकाणी एका योग कॅम्पसाठी आलेल्या 31 वर्षीय केनियन महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. हेमंत थपलियाल असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी हेमंतला अटक केली आहे.
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पीडिता केनियातून हिंदुस्थानात एका योगा कॅम्पसाठी आली होती. आरोपी हेमंत तिला याच योगा कॅम्पवर भेटला होता. आपण टुरिस्ट गाईड असल्याचं सांगत त्याने तिच्याशी ओळख वाढवली होती. कॅम्प संपल्यानंतर आपल्याला येथील प्रेक्षणीय स्थळ पाहायची आहेत, तेव्हा मला गाईड कर अशी विनंती तिने हेमंतला केली होती. त्यानुसार हेमंत तिला तिथल्या स्थळांवर घेऊन गेला. संध्याकाळी त्याने तिला नीर गुड्डू नावाच्या एका प्रसिद्ध ओढ्याजवळ नेलं. तिथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला.
पीडिता स्वतःची कशीबशी सुटका करून घेत तिथल्या मुख्य रस्त्यावर पोहोचली. पण तिच्या मागोमाग आलेल्या हेमंतने तिला आजूबाजूच्या झाडांमध्ये ओढत नेलं आणि पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने कसंबसं स्वतःचं हॉटेल गाठलं आणि पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी हेमंतला अटक केली असून त्याने यापूर्वीही अशा प्रकार बलात्कार केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.






























































