हर्णे गावाला पाणी पुरवठा करणारे खेम धरण पुर्णपणे आटले

हर्णे या मोठया लोकवस्तीच्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या  नळपाणी योजनेपैकी अडखळ हद्दीतील खेम धरण पुर्णपणे आटल्याने धरण पुर्णपणे सुकेठाक पडले आहे. त्यामुळे हर्णे गावाला आता पाणी पुरवठा करण्याची मदार फक्त बांधतिवरे येथील नळीपाणी योजनेवरच अवलंबून आहे. त्यामुळे हर्णे गावाला सुरळीत आणि पुरेसा पाणी पुरवठा करण्याचे काम विस्कळीत झाले आहे. कधी एकदाचा पाऊस पडतो आणि आटलेले खेम धरण पुन्हा पाण्याने भरून विस्कळीत होत असलेला पाणी पुरवठा सुरळीत होण्याकडे हर्णेवासीयांच्या नजरा लागून राहील्या आहेत.

रत्नागिरी जिल्हयात मासेमारीसाठी सुप्रसिध्द असलेल्या हर्णे बंदर गावासह जिल्हयात सर्वाधिक मच्छिमारी समाज बांधवांची वस्ती असलेल्या पाजपंढरी या गावांसह पाळंदे आणि अडखळ या गावांची तहान भागवणा-या खेम धरणाच्या बांधकामास 1971 मध्ये सुरूवात करण्यात आली होती. खेम धरण साधारणपणे 1974 मध्ये बांधुन पूर्णत्वास गेले तद्नंतर 1985 मध्ये या धरणाच्या देखभाल दुरूस्तीसाठी हर्णे ग्राम पंचायतीकडे धरणाचे हस्तांतर करण्यात आले. खेम धरणाचा कॅचमेट एरिया 0.90 स्केअर मैल पाण्याने व्यापला असून खेम धरणाच्या पाणी साठयाची क्षमता 36 कोटी 45 लाख लिटर म्हणजेच 13.50 एमसीएफटी आहे.

मच्छिमारीसाठी ख्याती असलेल्या हर्णे गावात स्थानिकांसह व्यापारासाठी आलेल्यांची झपाटयाने वाढत चाललेली लोकसंख्या लक्षात घेता धरणाची उभारणी करते वेळी गृहीत धरलेली तेव्हाची दरडोई लोकसंख्या आणि सद्यस्थितीतील लोकसंख्या यात खुपच मोठा फरक झालेला आहे. धरणात पाणीच षिल्लक नसल्याने ग्राम पंचायत प्रशासनाला रहीवाशांना पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. धरणातच पाणीसाठा उपलब्ध नसल्याने लोकांचीही तशी फारशी ओरड होत नाही. मात्र खाजगी पाणी पुरवठा करणा-यांचे दर रहीवाशांना परवडत नसल्याने शासनाने टॅकरव्दारे पाणी पुरवठा करायला हवा अशाप्रकारची मागणी आता जोर धरून लागली आहे.

धरणात पाणीसाठा उपलब्ध असतो तेव्हा खेम धरणातून फक्त हर्णे, पाळंदे आणि अडखळची खेम वाडी यांनाच पाणी पुरवठा धरणातून केला जातो. अशा या धरणाच्या भिंतीला भगदाड पडून धरणातून पाणी गळती सुरू झाली होती. त्यासाठी 2 कोटी 45 लाख रूपये निधी खर्च करून धरण दुरूस्तीचे काम करण्यात आले असले. तरी धरणात साठलेला गाळ पाहता धरणात पाण्याचा साठा होत नाही. त्यामुळे धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घ्यायला हवे. तसे झाले तर पाणी साठयाच्या खमतेत ववाढ होईल. हर्णे गावाचा विस्तार पाहता सर्व वाडया वस्त्या, मोहल्ले, पेठा यांना आठवडयातून दोनदाच पाणी पुरवठा करण्याची नामुष्की ग्राम पंचायत प्रशासनावर आली आहे.