
देशातील गरिबीचे धक्कादायक वास्तव केरळमध्ये उघडकीस आले आहे. एक महिला अपार कष्ट घेऊनही मुलांची भूक भागवू शवली नाही. त्यामुळे तिच्या सहा मुलांनी माती खाण्यास सुरुवात केली. बालकल्याण समितीने मुलांचा ताबा घेतल्यानंतर हे वास्तव उजेडात आले. असहाय्य महिलेला संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पालिकेने तिला नोकरी दिली असून सरकार घर देणार आहे.
सचिवालयापासून एक किलोमीटर अंतरावर तंबूमध्ये राहणार्या श्रीदेवीने मुलांच्या व्यथेकडे सरकारचे लक्ष वेधले. नवरा दारू पितो. त्यामुळे मला एकटीला सहा मुले सांभाळणे अशक्य बनतेय, असे सांगून तिने मुलांचा ताबा घेण्यासाठी बालकल्याण समितीला विनंती केली होती. त्यानुसार समितीने चार मुलांना ताब्यात घेतले असून दोन मुलांना आश्रमगृहात पाठवण्यात आले आहे. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नये याची खबरदारी सरकार घेणार आहे.
दारुड्या पित्याचे नातलगांवर खापर
दारुड्या पित्याने मुलांच्या व्यथेला नातलग जबाबदार असल्याचे म्हटले आहे. मी मुले सांभाळण्यास सक्षम आहे. मुलांना बालकल्याण समितीकडे सोपवण्याआधी पत्नीने मला कळवले नाही. पत्नीवर काही नातेवाईकांचा दबाव आहे, असा आरोप त्याने केला.






















































