शेतकऱ्याने दिले हरणाला जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। किल्लारी

तपसे चिंचोली शिवारात विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला चिंचोली येथील शेतकरी मारुती नेटके यांच्यासतर्कतेमुळे जीवदान मिळाले. पाण्याच्या शोधात हे हरीण नेटके यांच्या शेतात आले होते. हरीण विहीरीत पडल्याचे लक्षात आल्यावर नेटके यांनी प्रथम वन कर्मचाऱ्यांना कळवले. काही वेळातच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरून हरणाला वर काढण्यात आले.

हरीण कडाक्याच्या थंडीने घाबरून गेले होते तसेच त्याला थोडीफार दुखापत झाली होती. यामुळे त्याला प्राथमिक उपचारासाठी लामजना येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. तपसे चिंचोलीच्या गावालगत नेटके यांची शेती आहे. त्या परिसरात हरणांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. शेतात असलेल्या विहिरीलगत छोटा पाण्याचा हौद आहे .पाणी पिण्यासाठी इकडे हरणांचा कायम कळप येत असतो .

या भागात पडीक जमीन व माळरान मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे हरणांची संख्या जास्त आहे. या भागात चारा आणि पाण्याची समस्या असल्याने हरणे लोकवस्तीत येऊ लागली आहेत. वनविभागाने या भागात पाण्याची सोय करावी अशी मागणी होत आहे. जनावरे ,हरणे सतत पाणी पिण्यासाठी या भागात येत असल्याने नेटके यांनी पिण्याच्या पाण्यासाठी त्यांच्या शेतात हौद बांधले आहेत.

वनकर्मचारी राहुल शिंदे, म्हणाले की, हरीण थोडे जखमी असल्याने त्यास प्राथमिक उपचार करून पुन्हा वनविभागात सोडण्यात आले आहे वनविभागात प्राण्यांसाठी पाण्याची सोय केलेली आहे. मात्र पाऊस नसल्याने हिरव्या चा-यांची टंचाई आहे. त्यामुळे हिरव्या चा-यासाठी हे प्राणी शेताच्या दिशेने येत आहेत.