
काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर यांना कर्करोगाचे निदान झाले होते. कर्करोगावरील उपचारादरम्यानही शो मस्ट गो ऑन म्हणत त्या छोटय़ा पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये त्या परीक्षकाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
आपला आनंद व्यक्त करताना किरण खेर म्हणाल्या, हा शो माझ्या हृदयाजवळचा आहे. शोचा एक भाग बनणे माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. जणू मी माझ्या घरीच परततेय, असे मला वाटत आहे. गेल्या नऊ सीजनपासून मी इंडियाज गॉट टॅलेंटचे परिक्षण करतेय. देशभरातील वैविध्यपूर्ण आणि विलक्षण प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या शोने केले आहे.


























































