
>> किरण खोत (निवेदक, सूत्रसंचालक)
आपण एखाद्या विषयावर बोलतो तेव्हा त्या बोलण्यात सहजता तेव्हाच येते जेव्हा तो संपूर्ण विषय प्रथमतः आपल्याला पूर्णपणे पटलेला असतो.
काही वत्ते एखाद्या विषयावर अगदी सहज बोलत राहतात, तर काही वक्त्यांना मात्र बोलण्यासाठी कागद, मॉनिटर स्क्रीन, मोबाइल किंवा इतर गोष्टींचा आधार घ्यावा लागतो.
माणसं अडखळत बोलतात याचं कारण त्यांना या गोष्टीची खात्री नसते की, जेथे जे विचार ते मांडत असतात, त्यांच्याशी पहिलं त्यांचं गणित जुळलेलं आहे की नाही.
गोष्टी मनाला पटल्या की, आपल्याला त्या विषयावर बोलण्यासाठी कुठलीच स्क्रिप्ट किंवा कुठलेच मुद्दे पाठांतर करावे लागत नाहीत. ते एखाद्या संवादासारखे सहज आपल्या मुखातून निघून जातं. म्हणूनच नवख्या वक्त्यांनी बोलत असताना आपल्या आवडीचा सहज, साधासोपा विषय निवडावा आणि आपल्या संभाषण कौशल्याची धार वाढवण्यासाठी हळूहळू सोप्या विषयाकडून कठीण विषयाकडे प्रवास करावा. घरात लहान मुलांशी मारलेल्या गप्पा, मित्रांसोबत केलेल्या चर्चा आणि आपल्या सहयोगी कर्मचाऱयांसोबत केलेले विचारमंथन अशा अनौपचारिक गप्पांमधून आपण स्वतःचा आत्मविश्वास वाढवायला हवा. त्यानंतर हळूहळू आपलं वाचन वाढवत आपल्या ज्ञानाचा, शब्दांचा कोश आपल्याला भरत जायला हवा, जेणेकरून योग्य ठिकाणी, योग्य वेळी आपल्याला योग्य दाखले देता येतील.
एखाद्या वैचारिक कार्यक्रमामध्ये तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर तुम्हाला श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वांची आत्मचरित्रं, त्यांच्या यश-अपयशाच्या असणाऱया गोष्टी, काही विनोद, बोलीभाषेतल्या काही म्हणी, त्यासोबत काही सुविचार, चारोळ्या, कविता, शेरोशायरी यांचे वाचन तुम्ही करणे खूप गरजेचे असते. आजकाल बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण गुगलच्या आधारे हवी ती माहिती किंवा हवा तो प्रश्न विचारून आपल्याला हवी ती माहिती चुटकीसरशी मिळवता येते, परंतु आपण सादर केलेली माहिती योग्य आहे की नाही, याचाही पडताळा आपण करायला हवा.
विषयात सहजता ठेवण्यासाठी आपण वेळेचे व्यवस्थापनदेखील करायला हवे. श्रोत्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी आणि कठीण कठीण शृंगारिक शब्द न वापरता, जे लोकांच्या सहज पचनी पडेल अशा भाषेत तो मुद्दा त्यांना समजावून सांगावा. लक्षात ठेवा, संभाषण कौशल्य शिकणं म्हणजे नुसतं भाषण देणे नव्हे, तर समोरच्या श्रोत्यांशी मनापासून संवाद कसा साधायचा हे समजून घेणं होय.


























































