हसन मुश्रीफ यांच्या घरावरची रेड म्हणजे दिल्लीकरांची ‘कमिटमेंट’? सोमय्यांची ‘ती’ क्लिप व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर 11 जानेवारी रोजी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने छापा टाकला होता. त्या छाप्याची कमिटमेंट ‘दिल्लीकरां’ची असल्याची प्रतिक्रिया देणारी भाजप नेते किरीट सोमय्या यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.

11 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीचे छापे पडले. ही छापेमारी सुरू असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया विचारण्यासाठी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या निवेदिकेने त्यांना फोन केला. त्याच वेळी सोमय्या हे दुसऱ्या फोनवर बोलत होते. त्यावेळी पलिकडच्या व्यक्तिला सांगताना त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा पडला असून दिल्लीकरांनी आपली कमिटमेंट पूर्ण केल्याचं म्हटलं. हा फोनो घेत असल्याची व्हिडीओ क्लिप देखील व्हायरल झाला आहे. दै. सामना या व्हिडीओ किंवा ऑडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. पण, या क्लिपमुळे चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुश्रीफ यांच्या घरावरील छाप्यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीय यांच्या विरोधात मनी लाँड्रींगसह अनेक कंपन्यांत पैसे गुंतवल्याची तक्रार करून, ईडीचे छापे पडणार असल्याचे वक्तव्य वारंवार केलं होतं. तसेच सोमय्या यांनी कोल्हापुरात येऊन मोठी स्टंटबाजीही केली होती. त्यावेळी मुश्रीफ यांच्याकडून सोमय्यांवर शंभर ते एक हजार कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोमय्यांच्या या व्हायरल व्हिडीओमुळे हे खूप मोठ षडयंत्र असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.