
>> मीना आंबेरकर
आपल्या स्वयंपाकघराप्रमाणे त्यातील उपकरणांचे महत्त्वही तितकेच असते. त्यांचीही योग्य काळजी घ्यावी लागते.
स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना आपण वेगवेगळी उपकरणे वापरतो. त्यातील काही उपकरणे ही विजेवर चालणारी असतात. ती हाताळताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, तशीच ती उपकरणे कशी वापरावीत यासंबंधी माहिती घेणार आहोत.
त्याबाबत सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओल्या हाताने ही उपकरणे, त्यांची बटणे व प्लग हाताळू नयेत. पायात रबरी चपला घालून ही उपकरणे हाताळावीत म्हणजे शॉक बसत नाही. उपकरणांची बटणे/ बोर्डची दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा. स्वीच ऑन ठेवून एक प्लग काढून दुसरा घालू नये.
इलेक्ट्रिक शेगडीवर द्रव पदार्थ उकळत ठेवला असता ते उतू जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यामुळ शॉक लागू शकतो. इलेक्ट्रिक टोस्टर वापरल्यावर साफ करावेत. त्यात पडलेले ब्रेडचे कण लगेच काढून टाकावेत. कारण त्यामुळे झुरळे येतात किंवा हे कण कॉइलमध्ये अडकून स्पार्क पडू शकतो. ओव्हनमध्ये तूप, लोणी व इतर द्रव पदार्थ सांडणार नाहीत याची काळजी घ्यावी. ओव्हनचे बटन ऑन असताना त्याचे झाकण उघडून त्यात पदार्थ ठेवू नयेत. ओव्हन थंड झाल्यावर तो स्वच्छ पुसून ठेवावा. मिक्सर/ ब्लेंडरची सर्व पाती कोरडी ठेवावीत म्हणजे ती गंजणार नाहीत. वापरल्यावर पाते काढून प्रथम साबणाच्या कोमट पाण्याने व नंतर थंड पाण्याने भांडे धुवावे. कोरडे करून ठेवावे. मिक्सर चालवताना त्यातील द्रव पदार्थ बाहेर पडून मोटर ओलसर होणार नाही याची खात्री करावी, नंतर सर्व मशीन स्वच्छ पुसावी. वापर नसताना त्यावर कव्हर घालावे. दिलेल्या वेळाहून जास्त वेळ मिक्सर चालवू नये. मोटर खराब होते. मिक्सरच्या भांडय़ात पुरेसे द्रव किंवा घन पदार्थ घालून ते वापरावेत म्हणजे ब्लेड खराब होत नाहीत. कोरडय़ा भांडय़ात ओले, ओल्यात कोरडे घालून मिक्सर चालवू नये.
फ्रीज आतून बाहेरून स्वच्छ ठेवावा. आठवडय़ातून एकदा फ्रीज डिफ्रॉस्ट करावा. आतून-बाहेरून सौम्य साबण पाण्याने स्वच्छ पुसावा व मग स्वच्छ फडक्याने कोरडा करावा. साफ करताना प्लग काढून ठेवावा. आतील काचा, काचेचे शेल्फ बाहेर काढल्यावर गरम पाण्यात ठेवू नयेत. तडकू शकतात.
तांदळाची खीर
साहित्य – 1 वाटी आंबेमोहोर तांदूळ, 1 लिटर दूध, 1 मोठी वाटी क्रीम किंवा घरगुती साय, साखर दीड वाटी, नारळाचा चव 1 वाटी, 1 टे. स्पून तूप, 4 लवंगा, 4 वेलदोडे, 1 इंच दालचिनीचा तुकडा.
कृती – तांदूळ कोरडे भाजावेत. रंग बदलला की खाली उतरून एकदा पाण्याने धुवावेत. नंतर 3 वाटय़ा पाणी घालून पुन्हा शिजवावे. नारळाचा खव घालावा. दाटसर होईपर्यंत शिजवावे. साखर घालावी. दोन-तीन उकळय़ा येऊ द्याव्यात. खाली उतरावे. एका कडल्यात तूप गरम करून त्यात लवंग, दालचिनी, वेलची घालावी, ही फोडणी वरून घालावी. घोटलेली साय किंवा बाजारी क्रीम घालून ढवळावे.
दडपे पोहे
साहित्य – पोहे 2 वाटय़ा, कांदा 1 बारीक चिरून, नारळ चव 1 वाटी, नारळाचे पाणी, लिंबू रस 2 टे.स्पून, मीठ 1 टी स्पून, हिरवी मिरची चवीनुसार, फोडणीसाठी तेल, कोथिंबीर, साखर आवडत असल्यास 1 चमचा.
कृती – पोहे, कांदा चिरलेला, नारळ चव, मिरचीचे तुकडे, मीठ, साखर एकत्र करून त्यावर नारळाचे पाणी व लिंबू रस शिंपडावा. सगळे मिश्रण दाबून त्यावर झाकण ठेवून द्या. अर्ध्या तसानंतर तेलाची फोडणी देऊन कोथिंबीर मिसळून खाण्यास द्यावे.
टीप – पोहे पातळ असल्यास फार वेळ दाबून ठेवून नयेत. तसेच धुवून वापरावेत. तेही फार मुरू देऊ नयेत. कांद्याऐवजी काकडीचा कीस किंवा टोमॅटो घालूनही दडपे पोहे करता येतात.
मसाले भात
साहित्य – 1 वाटी ओले मटार दाणे, 2 वाटय़ा तांदूळ, 1/2 वाटी दही, तिखट, मीठ, 2 हिरव्या मिरच्या, कढीलिंबाची 10-12 पाने, 1/2 वाटी तेल, फोडणीचे साहित्य, कोथिंबीर, ओले खोबरे.
मसाला पूड – दोन टे.स्पून घेणे, 1 टी स्पून जिरे, 4-5 लवंगा, 2 इंच दालचिनीचा जाड तुकडा, सगळय़ाची बारीक पूड करून ठेवणे.
कृती – तांदूळ धुवून घ्यावेत. पातेल्यात तेलाची फोडणी करून त्यात हिंग, मोहरी, हळद, ओल्या मिरच्या घालाव्यात. नंतर वाटाणे घालावेत. चांगले परतावे, नंतर तांदूळ घालून परतावे. उकळीचे पाणी घालावे. दही, तिखट, मीठ, पूड केलेला मसाला घालावा. भात शिजू द्यावा. वाढताना वरून खोबरे, कोथिंबीर घालावी.


























































