
तीन महिन्यांपूर्वी कसोटी संघातून वगळल्यानंतरही आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेसाठी निवड झालेला के. एल. राहुल दुर्दैवी ठरला आहे. 1 मे रोजी बंगळुरूविरुद्ध सामन्या दरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्यांच्या मांडीला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आता दोन महिने मैदानाबाहेर राहावे लागणार आहे. त्यामुळे त्याला आयपीएल आणि आगामी डब्ल्यूटीसीमधूनही माघार घ्यावी लागली आहे.
– आता दुखापतीमुळे आपल्याला खेळता येणार नसल्याचे कळताच राहुलने इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर केली, त्यात तो म्हणाला, हिंदुस्थानी संघाच्या वैद्यकीय टीमशी चर्चा केल्यानंतर माझ्या मांडीवर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. आगामी आठवडय़ात या दुखापतीतून लवकरात लवकर बरे होण्याचे माझ्यापुढे आव्हान असेल. शस्त्रक्रिया करणे हा एक कठीण निर्णय आहे, पण पूर्णपणे बरा होण्यासाठी हाच निर्णय योग्य असल्याची मला पूर्ण कल्पना आहे. संघाचा कर्णधार या नात्याने मला या महत्त्वाच्या वेळी संघाबरोबर नसल्याचे खूप दुःख होतेय. पण मला विश्वास आहे, माझे लखनौ संघातील सहकारी आपला सर्वोत्तम खेळ पुढेही कायम ठेवतील. मी पुढचा प्रत्येक सामना पाहणार आहे आणि संघाला प्रोत्साहनही देणार. तसेच मी पुढच्या महिन्यात डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात ओव्हलवर नसणार यामुळेही खूप निराश झालोय. मी संघात परतण्यासाठी आणि देशासाठी खेळण्यासाठी सर्व काही करीन. हीच माझी नेहमी प्राथमिकता राहिली आहे. मागील काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. दुखापत होणे कधीही सोप्पी गोष्ट नसते, पण मी नेहमीप्रमाणे माझे सर्वस्व पणाला लावेन आणि पुन्हा येईन. मला पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार.
भरतसाठी मार्ग मोकळा
डब्ल्यूटीसीसाठी हिंदुस्थानी संघात एकच स्पेशालिस्ट यष्टिरक्षकाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राहुलला यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून संघात संधी मिळण्याची शक्यता होती, पण आता तो बाहेर गेल्यामुळे ओव्हलवर श्रीकर भरतशिवाय हिंदुस्थानसमोर दुसरा एकही पर्याय उरलेला नाहीय. तसेही श्रीकरची यष्टिरक्षक म्हणून कामगिरी फारशी उत्साहवर्धक झालेली नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआयपुढे इशान किशनच्या पर्यायही उपलब्ध झाला आहे. भरत एक यष्टिरक्षक म्हणूनही फार दमदार कामगिरी करू शकलेला नाही. त्याला चार कसोटी खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याने 20 धावांच्या सरासरीने 101 धावा केल्या आहेत, तर यष्टीमागे 7 झेल आणि एक यष्टिचीत केले आहे.


























































