कोमसाप मराठी साहित्याचा झेंडा सातासमुद्रापार फडकवणार, मॉरिशस येथे होणार साहित्य संमेलन

मुंबईसह कोकणात साहित्याचा जागर केल्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषद आता मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकवणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद मॉरिशसला संमेलन घेणार आहे. दि.2 ते 4 डिसेंबर रोजी मॉरिशस येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनात मराठी साहित्यातील अनेक नामवंत साहित्यिक सहभागी होणार आहेत. संमेलनात विविध विषयावरील परिसंवाद, चर्चासत्र, कविता वाचन असे विविधांगी कार्यक्रम सादर होणार आहेत.

गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ कोकणात साहित्यिक चळवळ राबवणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेने कोकणात अनेक उपक्रम राबवले. साहित्य संमेलने घेतली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नवी मुंबई, मुंबई, पालघर आणि ठाणे या परिसरात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या शाखा कार्यरत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद मध्यवर्ती साहित्य संमेलन आयोजित करते. त्याचबरोबर जिल्हा साहित्य संमेलनेही आयोजित केली जातात. कोमसापच्या वतीने दरवर्षी साहित्य पुरस्कारही देण्यात येतात. कोकणातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम कोकण मराठी साहित्य परिषद करत आहे. मुंबईसह कोकणात साहित्याचा जागर केल्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेने एक मोठे पाऊल उचलले आहे मराठी साहित्याचा झेंडा मॉरिशसमध्ये फडकवण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सज्ज झाली आहे. दि.2 ते 4 डिसेंबर रोजी मॉरिशस येथे कोमसापचे साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनासाठी कोमसापचे साहित्यिक 29 नोव्हेंबरला मॉरिशसला रवाना होणार आहेत. 2 ते 4 डिसेंबरला संमेलन रंगणार असून 4 डिसेंबरला हे साहित्यिक पुन्हा हिंदुस्थानात परतणार आहेत.