चाकरमान्यांच्या आगमनाने मुंबई- गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी, संगमेश्वरात वाहनांच्या दोन किमीच्या रांगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन आता जोरात सुरू झाले आहे. एसटी, खासगी बसेस आणि चारचाकी वाहनांनी चाकरमानी कोकणात दाखल होत असून, मुंबई गोवा महामार्ग अक्षरश: फुल्ल झाला आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

संगमेश्वर सोनवी पूल येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या तब्बल दोन किमी लांबीच्या रांगा लागत असल्याने भक्तगण आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत.  संगमेश्वर जवळच्या शास्त्रीपूल पासून संगमेश्वर बसस्थानक हे दोन किमीचे अंतर गाठायला जवळपास दीड तासाचा वेळ लागत आहे. सोनवी पूलावरुन खड्ड्यांमुळे दुहेरी वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

वाढलेल्या खड्यांमुळे प्रवासाचा त्रास आणि प्रवासाचे तास वाढले आहेत. गणेशोत्सवासाठी खरेदीची लगबगही सुरू झाली असून, बाजारपेठेत चांगलीच गर्दी उसळली आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाचा सण असलेला गणेशोत्सव आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. शुक्रवारपासून या उत्सवाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असून, पुढील 5 दिवस गणेशोत्सव प्रत्येक गावात, वाडीत आणि घरात रंगणार आहे. त्यामुळे कोकणात प्रचंड उत्साहाचे वातावरण आतापासूनच दिसून येत आहे. गेले चार दिवस कोकणपट्टीत जोरदार पाऊस सुरु असल्याने भक्तगणांच्या उत्सवातील उत्साहाला आपोआप मर्यादा आल्या आहेत.

हजारोंच्या संख्येने मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातून चाकरमानी आपल्या गावी या सणासाठी येतात. आता जादा एसटी बसेस, तसेच खासगी बसेस आणि खासगी गाड्यांमधून चाकरमानी गावात येण्यास सुरुवात झाल्याने, मुंबई – गोवा महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा दिसून येत आहेत.

चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी पूर्ण होऊन रस्ते खुले झाले असले, तरी सुरू असलेले काम त्यासाठी बायपास केलेले रस्ते आणि जुन्या रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे, तसेच अविरत पडणारा पाऊस, यामुळे मात्र वाहतुकीला काही ठिकाणी प्रचंड अडचण निर्माण होऊन खोळंबा होत आहे. प्रवासाला दोन ते तीन तास अधिक लागत आहेत. मुंबईतून संगमेश्वरला येण्यासाठी सध्या 14 तासांचा कालावधी लागत असल्याचे बसचालकांनी सामना जवळ बोलतांना सांगितले.