अंबाबाई मंदिर परीसरातील चप्पल स्टँड हटवण्यास सुरुवात, पोलीस आणि स्टँडवाल्यांमध्ये झटापट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील चप्पलस्टँड हे बेकायदेशीर असल्याचे म्हणत महानगरपालिकेने ते हटविण्याची मोहीम मंगळवारी सकाळी सुरू केली. यावेळी चप्पल स्टँड चालकांनी त्याचा कडाडून विरोध केला. विरोध करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण हे लक्षणीय होते. चप्पल स्टँड चालकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. महिला पोलिसांनी विरोध करणाऱ्या महिलांना फरफटत तिथून बाहेर काढले. विरोध करणाऱ्या पुरुषांनाही पोलिसांनी धक्के मारून बाहेर काढले आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी कारवाईला सुरुवात झाली. कारवाई सुरु झाल्यानंतरही चप्पल स्टँड चालकांनी तो रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस बळासमोर त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अधिकृत चप्पल स्टँड सुरू केला होता.हा स्टँड सुरू झाल्यानंतर खासगी चप्पल स्टँडचालकांना त्यांचे स्टँड हे बेकायदेशीर असल्याचे सांगत काढून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. खासगी चप्पल स्टँड चालकांनी याला विरोध केला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सुरू केलेला स्टँड आणि खासगी स्टँड दोन्ही निशुल्क सेवा देतात, मात्र खासगी स्टँड हे बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांना हटवण्यासाठी महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. स्टँड चालक ऐकत नसल्याने महापालिकेने हे स्टँड जमीनदोस्त करण्यासाठी बुलडोझर मागवला आहे.