जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या संख्येने जिल्हा व आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातच शनिवारी रात्री बिंदू चौक सबजेलमधील तब्बल 31 कैदी कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हादरलेल्या कारागृह प्रशासनाने कारागृहातील कोविड केअर सेंटरमध्येच या कैद्यांवर उपचार सुरू केले आहेत.
बिंदू चौक उपकारागृहात सुमारे 200हून अधिक कच्चे कैदी आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन गतवर्षीच नव्याने दाखल होणारे कच्चे कैदी आयटीआय येथील तात्पुरत्या कारागृहात दाखल करण्यात येत होते. तेथे अलगीकरण कालावधीनंतर तपासणीनंतर बिंदू चौक उपकारागृहात ठेवण्यात येत होते. गेल्या तीन महिन्यांत कोरोनाचा कहर काहीअंशी ओसरल्यानंतर ही प्रक्रिया बंद झाली. आता कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला असून, 5 एप्रिल रोजी या कारागृहातील दोन कैद्यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यांतर्गत तपासणीसाठी इचलकरंजीला नेण्यात आले होते. कारागृहात परत येताना आरटीपीसीआर चाचणीत एका कैद्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या संपर्कातील 82 कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल शनिवारी रात्री कारागृह प्रशासनाला प्राप्त झाला. यामध्ये तब्बल 31 कैद्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. 51 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कारागृह निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, कोरोनाबाधित कैद्यांवर कारागृहातच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू केले आहेत. तसेच, योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याची माहिती कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांनी दिली आहे.