
सनईचे मंजुळ सुर, फुलांनी सजलेला पाळणा, आत्तीच्या कानात कुर्र आणि पाठीवर थाप मारत शुभ्रा…शुभ्रा…शुभ्रा नावाचा घोष करुन आज चक्क येथील कोविड सेंटरमध्ये नामकरण (बारसे) संपन्न झाले. चार-पाच दिवसांपूर्वी 103 वर्षाच्या आज्जीला ठणठणीत बरे करून तिचा वाढदिवस साजरा करुनच घरी पाठविल्यानंतर आज व्हाईट आर्मीच्या ऐतिहासिक दसरा चौकातील जैन बोर्डिंगमधील कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या माता आणि तिच्या नवजात बाळाचे नामकरण सोहळा करुनच माहेरी पाठविण्यात आले. अशाप्रकारे झालेल्या या नामकरण सोहळ्यामुळे कोविड सेंटरमधील वातावरणही कौटुंबिक झाले होते.
अमृता सचिन गुरव (वय – 28, रा. मुंबई) ही तीन महिन्यांपूर्वी प्रयाग चिखली, ता. करवीर येथे माहेरी बाळंतपणासाठी आली होती. एका नामांकित प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरकडे तिच्यावर गरोदरपणात उपचार सुरू होते. पण दिवस भरल्यानंतर 3 सप्टेंबर रोजी तिच्या पोटात दुखू लागल्याने त्या दवाखान्यात नेले असता स्वॅब घेतल्याशिवाय तिला दाखल करून घेण्यास डॉक्टर तयार झाले नाहीत. अशातच तिचा स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरने या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घ्यायला नकार दिला. घरच्या लोकांची तारांबळ उडाली. पण जवळच्याच एका डॉक्टरांनी कर्तव्य भावनेने त्या महिलेची यशस्वी प्रसुती केली. पण कोरोना पाॅझीटिव्ह असल्याने माहेरच्या लोकांची काळजी वाढली होती.
अशात तिच्या नातेवाईकांकडुन अडचण समजताच व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी क्षणाचाही विलंब न करता या मातेला तात्काळ व्हाईट आर्मीच्या दसरा चौक येथील जैन बोर्डिंग मधील कोविड केअर सेंटर मध्ये दाखल केले. बाळाची काळजी घ्यायला तिची जुनी जाणकार आजी सुद्धा याच कोविड सेंटरमध्ये राहिली. अमृताला मेडिकल असो.चे अध्यक्ष डॉ. आबाजी शिर्के आणि त्यांचे सहायक डॉ. अमोल कोडोलीकर या दोघांच्या देखरेखीखाली तब्बल बारा दिवस उपचार करण्यात आले.या काळात व्हाईट आर्मीच्या नर्स हिना यादवाड यांनी तर दिवसरात्र एक करून अमृताला काय हवंय काय नको याची काळजी घेतली. तिची मनापासून सुश्रूषा केली.सोबतीला व्हाईट आर्मीचे कोरोना योद्धे जवान होतेच. आता 13 दिवसांनी अमृताच्या सर्व घेण्यात आलेल्या चाचण्या पूर्णपणे निगेटिव्ह आल्या. त्यामुळे अमृता आपल्या नवजात कन्येसह माहेरी चालली आहे.

दरम्यान, व्हाईट आर्मीच्या वतीने या नवजात कन्येचे कौटुंबिक वातावरणात नामकरण करण्यात आले आहे. स्वत: व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे आजोबा आणि त्यांच्या पत्नी विजया रोकडे यांनी यांचे नियोजन केले. यावेळी त्या मातेचे आई-वडील, मामा यांच्यासह व्हाईट आर्मीचे जवान मामा आणि नर्सिंगस्टाफ मधील आत्या शिवाय या कोविड केअर सेंटरमधून कोरोनामुक्त होवून गेलेल्या काही महिलाही आवर्जून उपस्थित होत्या.

























































