कोल्हापूरची विमानसेवा पुन्हा ठप्प, ‘उडान’चा फज्जा

33

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा गेल्या महिन्यात केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र, आता रविवारपासून ही सेवा पुन्हा बंद करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विमानसेवा देणाऱया एअर डेक्कनकडून यासाठी तांत्रिक कारण देण्यात येत आहे. मात्र, तीन महिन्यांपासून कामगारांचा पगार थकविल्यामुळे ही विमानसेवा बंद पडली असल्याचे समोर येत आहे. याबाबत विमानतळ व्यवस्थापनाकडून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देण्यात येत असल्याने उलट-सुलट चर्चा सुरू आहे. याप्रकरणी सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डेक्कन कंपनीमार्फत कोल्हापुरातून दर रविवार, मंगळवार आणि बुधवार यादिवशी दुपारी एक ते सायंकाळी सव्वाचार या वेळेत कोल्हापूर-मुंबई सेवा सुरू करण्यात आली होती. येथील उद्योजकांसह सर्वसामान्य कोल्हापूरकरांमधून समाधानकारक चित्र असताना तसेच विमानतळ विस्तारीकरणाला अधिक निधी मंजुरीसह प्रत्यक्ष कामास सुरुवात होत असतानाच ही विमासेवा बंद करण्यात आल्याचे आज समोर आले.

यासंदर्भात उजळाईवाडी येथील प्रस्तावित छत्रपती राजाराम महाराज विमानतळ कार्यालयाशी संपर्क साधला असता, प्रवाशांचे बुकिंग आहे. मात्र, मुंबईहून आज विमान आले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी रविवारपासूनच विमानसेवा बंद झाल्याचे समोर येत आहे. यासाठी संबंधित विमान कंपनीकडून तांत्रिक कारण देण्यात येत आहे, तर दुसरीकडे गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचाऱयांचे वेतन थकल्यामुळे विमानसेवा बंद झाल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात येथील कर्मचारी बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे संशय बळावला आहे. आता शासन काय भूमिका घेते याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या