
आंब्यावर चिकटवलेला स्टिकर ज्यावेळी आपल्या मोबाईलवर स्पॅन करू त्यावेळी आंबा कुठच्या बागेतून आलाय, त्या बागेला जीआय प्रमाणपत्र आहे का, तो पाठवणाऱया शेतकऱयाचे नाव काय, शेतकऱयाचा संपर्क नंबर काय, त्याची पॅकिंग पद्धत, तसेच आंबा पिकवणारी यंत्रणा कशी आहे, आंबा कोणत्या दिवशी पॅक केला याची माहिती मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. प्रत्येक आंब्यासंदर्भात अशी माहिती मिळणार आहे. त्यामुळे हापूसच्या नावाखाली होणारी ग्राहकांची फसवणूक थांबवणार आहे.
मधुर अवीट गोडीच्या हापूस आंब्याचे नुसतं नाव उच्चारलं तरी जिभेवर स्वाद रेंगाळतो. म्हणूनच कोकणच्या हापूसला ‘आंब्याचा राजा’ म्हणतात. कोकणातील हापूसच्या नावावर बऱयाचदा गोलमाल होताना दिसते. अन्य राज्यांतील आंबा हा कोकणचा हापूस आंबा आहे असे भासवून विकला जातो. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होते. परिणामी हापूस बागायतदारांचे नुकसान होते. त्याला चाप लावण्यासाठी कोकणचा हापूस आंबा क्यूआर कोड लावून बाजारात येणार आहे. क्यूआर कोडमुळे आंबा कुठच्या बागेतून आलाय, शेतकऱयाचे नाव काय याची थेट माहिती मिळणार आहे.
कोकणच्या आंब्याला ‘हापूस’ नावाने भौगोलिक निर्देशांक (जीआय) प्राप्त आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे ग्रामीण या पाच जिह्यांतील आंबा हापूस नावाने बाजारात दाखल होईल. जीआय सर्टिफिकेट कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विव्रेते सहकारी संस्था, केळशी आंबा उत्पादक संघ, देवगड आंबा उत्पादक संघ आणि कोकण कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत बागायतदारांना दिले जाते. आतापर्यंत आठशेहून अधिक बागायतदार, प्रक्रियादार आणि व्यावसायिकांनी हे सर्टिफिकेट घेतलेले आहे. मात्र जीआय मानांकन मिळूनही हापूसची भेसळ सुरू आहे ती आता क्यूआर कोडमुळे रोखायला मदत होईल. त्यासाठी उत्पादक सहकारी संघाने क्यूआर कोडचा पायलट प्रकल्प हाती घेतला आहे.
यंदा क्यूआर कोडचे एक लाख स्टिकर तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा शेतकऱयांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती जीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये फीड करण्यात येईल. यामधून अस्सल हापूस आंबा ओळखणे सोपे जाईल, अशी माहिती कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विव्रेते सहकारी संस्थेचे डॉ. विवेक भिडे यांनी दिली.
































































