
रत्नागिरी शहर आणि परिसरात मोटरसायकल आणि सायकल चोरी करणारी टोळी पकडण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील मोटरसायकल व सायकल जप्त केल्या आहेत.
रत्नागिरी शहरामध्ये सध्या मोटार सायकल चोरीचे तसेच घरफोडी, चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथके तयार करुन त्यांना साध्या वेषामध्ये गस्त ठेवणेबाबत सुचना दिल्या.
त्याप्रमाणे रत्नागिरी शहर परिसरामध्ये सलग तीन ते चार दिवस तपास पथकाचे गस्त घालण्याचे काम सुरू होते. गस्तीच्या दरम्यान रत्नागिरी शहरातील नाचणे रस्त्यावर चार संशयास्पद व्यक्ती आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडील अधिक चौकशी केली असता, त्यांनी रत्नागिरी शहर परिसरामध्ये अनेक मोटार सायकल व सायकल चोरी केल्याची कबुली दिली. 1) यश राजकुमार शर्मा, वय-19 वर्षे, रा. घुडेवठार, रत्नागिरी, 2) सुरज सुरेश सकपाळ, वय-19 वर्षे, रा. तेली आळी, रत्नागिरी 3) विघ्नेश देंवेद्र भाटकर, वय-19 वर्षे, रा. तोणदे, भंडारवाडी, रत्नागिरी व विधीसंघर्षित बालक अशा एकूण चार जणांच्या ताब्यातुन तीन हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल, एक पल्सर मोटार सायकल, एक अपाची मोटार सायकल, एक बजाज कंपनीची सीटी 100 मोटार सायकल, दोन सायकल तसेच दोन मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 1,10,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. चोरुन नेलेल्या मोटार सायकलबाबत खात्री केली असता, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे मोटार सायकल चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत.
































































