
पनवेलजवळ मालगाडी घसरून झालेल्या अपघातामुळे तब्बल 27 तास कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे 26 एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्याची नामुष्की रेल्वेवर ओढावली. पंधरा गाडय़ा वेगवेगळय़ा स्थानकांमध्ये अडकून पडल्या. अनेक गाडय़ा शॉर्ट टर्मिनेट केल्या तर काहींचा मार्ग बदलला. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. हजारो प्रवाशी गाडय़ांमध्ये अडकून पडले. अन्नपाण्यापासून त्यांची तडफड झाली. टॉयलेटमधील वापराचे पाणीही संपल्याने आणखीनच कुचंबणा झाली. दरम्यान, सावंतवाडीला जाणारी पॅसेंजर ट्रेन वेळेत दिवा स्थानकात न आल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा उद्रेक झाला. थेट ट्रकमध्ये उतरून रेल रोको केला. जवळपास तासभर चाललेल्या या गोंधळाचा उपनगरीय मार्गावरील लोकल गाडय़ांनाही फटका बसला.
पनवेलहून वसईच्या दिशेने जाणारी मालगाडी शनिवारी दुपारी घसरल्याने दिवा-पनवेल मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सदरची वाहतूक रात्री उशिरापर्यंत पूर्ववत होईल अशी अपेक्षा होती, मात्र ती न झाल्याने रविवारीही घसरलेल्या मालगाडीचे आफ्टर शॉक दिसून आले. रेल्वेने येथील वॅगन हटवण्याबरोबरच रुळांच्या दुरुस्तीसाठी ब्लॉक घेतल्याने अप-डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प होती. त्यामुळे पहाटे कोकणच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या अनेक गाडय़ा ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या होत्या. तसेच अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात प्रवासी तासन्तास खोळंबले होते.
या गाडय़ांमधील प्रवाशांचा खोळंबा
लांब पल्ल्याच्या गाडय़ा पनवेल परिसरात आसल्यास बंचिंग होऊन काsंडी होऊ नये म्हणून रेल्वने जवळपास पंधरा गाडय़ा वेगवेगळय़ा ठिकाणी थांबवून ठेवल्या होत्या. डाऊन मार्गावर चंदिगड-मडगाव एक्प्रेस आणि नागपूर-मडगाव या एक्प्रेस ट्रेन दातिवली येथे थांबविण्यात आल्या होत्या. सीएसएमटी-मंगलोर एक्प्रेस दिवा येथे, दादर-सावंतवाडी एक्प्रेस निळजे येथे तर ओखा-एर्नाकुलम तळोजा येथे थांबविण्यात आली होती. अप मार्गावर सावंतवाडी-दिवा गाडी आणि मडगाव-सीएसएमटी एक्प्रेस पनवेल येथे थांबविण्यात आली होती. रोहा-दिवा मेमू नागोठाणे येथे, रत्नागिरी-दिवा गाडी कासू येथे थांबविण्यात आल्या होत्या. मडगाव-सीएसएमटी एक गाडी आपटा येथे तर दुसरी गाडी जिते येथे थांबविण्यात आली होती. तसेच कुडाळ-एलटीटी विशेष गाडी नागोठाणे येथे थांबविण्यात आली होती. कोकण रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी गाडय़ा उभ्या असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.
या गाडय़ा रद्द
लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगलोर एक्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव मांडवी एक्प्रेस, सीएसएमटी-सावंतवाडी एक्प्रेस, सीएसएमटी-पुणे एक्प्रेस, पुणे-सीएसएमटी एक्प्रेस, रोहा-दिवा मेमू, दिवा-रोहा मेमू, दिवा-चिपळूण मेमू, चिपळूण-दिवा मेमू, दादर-सावंतवाडी तुतारी एक्प्रेस, सावंतवाडी-दादर तुतारी एक्प्रेस, मडगाव-एलटीटी एक्प्रेस, मंगलोर-एलटीटी एक्प्रेस, पनवेल-खेड मेमू, खेड-पनवेल मेमू, मडगाव-सीएमएमटी एक्प्रेस, सावंतवाडी-दादर एक्प्रेस, सीएसएमटी-मंगलोर एक्प्रेस, सावंतवाडी-सीएसएमटी विशेष ट्रेन, एलटीटी- मडगाव विशेष गाडी, पनवेल-कुडाळ विशेष गाडी, कुडाळ-पुणे विशेष गाडी, 2 ऑक्टोबर रोजी चालवण्यात येणाऱ्या एलटीटी-मंगलोर, मंगलोर-एलटीटी या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.
सीएसएमटी–मडगाव एक्प्रेस दोन वेळा रिशेडय़ूल; प्रवासी बेहाल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मडगावसाठी शनिवारी रात्री 10.35 वाजता रेल्वेने दोनवेळा रिशेडय़ूल केली. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी सीएसएमटी येथे आलेल्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाली. 10.35 वाजताची गाडीची वेळ होती, मात्र मालगाडी घसरल्याने ती रविवारी पहाटे 4 वाजता सुटेल असे रेल्वेने स्पष्ट केले. सदर गाडी 4 वाजताही सोडणे शक्य न झाल्याने पुन्हा सकाळी 11.05 वाजता सुटेल असे सांगितल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता.
इतर सहा-सात एक्प्रेस पनवेलऐवजी कर्जत-लोणावळामार्गे वळवण्यात आल्या होत्या.
54 गाडय़ांना फटका
26 गाडय़ा रद्द, गाडय़ा इतर मार्गावर वळवल्या
शनिवारी रात्री आणि रविवारी चाकरमान्यांनी कुडाळसह सर्वच रेल्वे स्थानकांत प्रचंड गर्दी केली होती. अचानक गाडय़ा रद्द करण्यात आल्याने चाकरमान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कुडाळसह सिंधुदुर्ग जिह्यातील कणकवली, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकातही प्रवाशांचा खोळंबा झाल्याने मिळेल तिथे ठाण मांडून बसल्याचे चित्र होते. त्यातच पाऊस धो-धो कोसळत असल्याने आणि अनेक स्थानकांवर छप्पर नसल्याने प्रवाशांनी गाडय़ा पकडण्यासाठी पावसातच रांगा लावल्या होत्या. आज अप आणि डाऊन दोन्ही बाजूंना धावणाऱ्या बहुतांशी रेल्वे गाडय़ा निर्धारित वेळेपेक्षा काही काळ विलंबाने धावत होत्या. दरम्यान, अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वच स्थानकांत पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
एसटीचा दिलासा
कोकण रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने मदतीचा हात पुढे केला. सावंतवाडी एसटी बस डेपोमधून दोन जादा बसेस बोरीवलीसाठी सोडण्यात आल्याने चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला. यापैकी एक बस स्लीपर कोच आणि दुसरी साधी बस असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.
z सिंधुदुर्गातून सावंतवाडी, कुडाळ, कणकवली 6 बसेस या रेल्वे स्थानकातून थेट मुंबईला सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये सावंतवाडीमधून 2, कणकवलीतून 3, कुडाळमधून 1 अशा सहा गाडय़ा रेल्वे स्थानकातून सोडण्यात येत आहेत.
z रविवार 1 ऑक्टोबर रोजीच्या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडय़ा रद्द करण्यात आल्याने सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून प्रवासी तिकिटाची रक्कम 49 हजार 631 रुपये परत रोख स्वरूपात देण्यात आले.
z कोकण रेल्वे मार्गावरील नांदगाव स्टेशनहून राजधानी एक्प्रेस संध्याकाळी 4.22 वाजता, वैभववाडीहून सावंतवाडी दिवा 6.21 वाजता, ओरोसहून मांडवी एक्प्रेस 2.50 वाजता, मडुराहून गंगानगर एक्प्रेस पुढे निघाली.
मालगाडीच्या अपघातामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. त्याशिवाय वंदे भारत व जनशताब्दी या गाडय़ाही कल्याण-कर्जत मार्गे वळवल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी रद्द केल्याची घोषणा होताच प्रवाशी आणखी भडकले. चाकरमान्यांनी रेल रोको केल्याने पोलीस व अधिकारी यांनी धाव घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या रेल रोकोचा मध्य रेल्वे मार्गावरील लोकलवरदेखील परिणाम झाला. ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल गाडय़ा काही काळ ठप्प झाल्या. हार्बर मार्गावर 38 तासांचा मेगाब्लॉक सुरू असतानाच या गोंधळाची भर पडल्याने प्रवासी दुहेरी कात्रीत सापडले.
महाडमधील विन्हेरे रेल्वे स्थानकावर मत्स्यगंधा एक्प्रेस तब्बल आठ तास रखडली होती. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सहा तास पाणीही प्यायला मिळाले नाही. सुमारे दोन हजार प्रवाशांना रेल्वेने वाऱ्यावर सोडून दिल्याचे संतापजनक चित्र दिसून आले. खाण्यासाठीदेखील काहीही उपलब्ध नसल्याने प्रवाशांची उपासमार झाली.


























































