करवसुलीत सिंधुदुर्ग आघाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्गनगरी

नेहमीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा घरपट्टी व पाणीपट्टी या करवसुलीत आघाडीवर आहे. 2018-19 या आर्थिक वर्षातील 9 महिन्यात घरपट्टी 65 टक्के तर पाणीपट्टी 72 टक्के वसूल झाली आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत वैभववाडी तालुक्याने 75 टक्के वसुली करीत जिल्ह्यात आघाडीवर राखली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 429 ग्राम पंचायती असून 2018-19 साठी 19 कोटी 9 लाख 84 हजार रुपये एवढी एकूण मागणी आहे. यात 2017-18 ची थकबाकी 1 कोटी 38 लाख 65 हजार एवढी आहे. एकूण मागणीच्या 12 कोटी 33 लाख 31 हजार एवढी वसुली झाली आहे. वैभववाडी तालुक्याने एक कोटी 11 लाख 53 हजार मागणी पैकी 83 लाख 26 हजार एवढी वसुली करीत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.

कुडाळ तालुक्याने 3 कोटी 18 लाख 15 हजार पैकी 1 कोटी 95 लाख 1 हजार एवढी 65 टक्के वसुली केली आहे. कणकवली तालुक्यात 68 टक्के वसुली झाली असून 4 कोटी 13 लाख 18 हजार पैकी 2 कोटी 80 लाख 36 हजार एवढी वसुली केली आहे. मालवण तालुक्यात 2 कोटी 42 हजार 69 हजार पैकी 1 कोटी 71 लाख 11 हजार एवढी 71 टक्के वसुली केली आहे. देवगड तालुक्याने 2 कोटी 13 लाख 68 हजार पैकी 1 कोटी 44 लाख 96 हजार रुपये एवढी 68 टक्के वसुली केली आहे. सावंतवाडी तालुक्यात 3 कोटी 10 लाख 33 हजार पैकी 1 कोटी 54 लाख 86 हजार एवढी 50 टक्के सर्वात कमी वसुली केली आहे. वेंगुर्ला तालुक्याला एक कोटी 84 लाख 28 हजार एवढी मागणी असून 1 कोटी 12 लाख 45 हजार एवढी 61 टक्के वसुली झाली आहे. दोडामार्ग तालुक्याने 1 कोटी 16 लाख मागणीच्या 78 लाख 60 हजार एवढी वसुली करीत 68 टक्के काम केले आहे.

पाणीपट्टी वसुलीची 6 कोटी 80 लाख 52 हजार रुपये एवढी मागणी असून 4 कोटी 95 लाख 7 हजार रुपये एवढी वसुली झाली आहे. यातही वैभववाडी तालुका आघाडीवर राहिला आहे. 99 टक्के वसुली झाली आहे. केवळ 32 हजार रुपये वसुली शिल्लक आहे. यावसुलीत कुडाळ 70 टक्के, कणकवली 70 टक्के, मालवण 73 टक्के, देवगड 72 टक्के, सावंतवाडी 71 टक्के, वेंगुर्ले 78 टक्के, दोडामार्ग 68 टक्के अशाप्रकारे वसुली झाली आहे. एक कोटी 89 लाख 60 हजार रुपये एवढीच जिल्ह्यात पाणीपट्टी वसुली शिल्लक राहिली आहे.