कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू, एक जखमी; पूलाच्या संरक्षक कठड्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवरील हिंगणी पुलावर कारने एका दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन इसम नदी पात्रातील पाण्यात पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील दुसरा इसम गंभीर जखमी झाला आहे. शांताराम बाबुराव आहेर (50) असे मयत इसमाचे नाव असून तो कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील रहिवासी आहे. तर बाळासाहेब यशवंत रणशुर (56) असे जखमी इसमाचे नाव असून ते मुर्शतपुर येथील रहिवासी आहेत. हिंगणी पुलाला संरक्षक कठडे नसल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दुचाकीवरील दोन्ही इसम हे हिंगणीकडुन मुर्शतपुर कडे येत असताना कारने त्यांना हिंगणी पुलावर जोराची धडक दिली. गोदावरी नदी पात्रात मासेमारी करणारे व स्थानिक नागरिक यांनी सदर दोन्ही इसमांना पाण्याबाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमी बाळासाहेब यशवंत रणशुर यांच्या डोक्याला इजा झाल्याने त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शांताराम आहेर यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे. दरम्यान तालुका पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहे.

सदर अपघाताने हिंगणी पुलावरील कठड्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनेक वर्षापासून या पुलाला कठडेच नाहीत, त्याबाबतच्या बातम्या विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याही होत्या. सदर पूल मृत्यूचा सापळा बनला असून त्या पुलावर कठडे असते तर ही दुर्दैवी घटना घडली नसती असे नागरिकांचे म्हणणे असून त्यांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने पुलाला कठडे बसविण्याची मागणी केली आहे.